आतिष भोईर, कल्याण : बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून (KDMC) मानपाडा (Manpada) पोलीस ठाण्यात एकाच वेळी 27 विकासकांकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आर्किटेक्ट संदीप पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करत केडीएमसीकडे तक्रार केली होती. तक्रारी वरून केडीएमसीने 67 बनावट बांधकाम परवानग्याप्रकरणी 27 विकासकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
महापालिकेचे बनावट सही शिक्के वापरुन बनावट बांधकाम परवानगी कागदपत्र तयार करण्यात आले होते. त्याच आधारे रेराकडून देखील प्रमाणपत्र मिळवून शासनाची आणि ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार उघड होताच एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु होती. तत्कालीन महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना बनावट परवानगी दाखवून रेराचे सर्टिर्फिकेट मिळविण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. महापालिकेने या प्रकरणाची चौकशी सुरु केली. महापालिकेच्या चौकशीत त्यानंतर ही धक्कादायक बाब उघडीस आली.
केडीएमसीचे अधिकारी अतुल पानसरे यांच्या तक्रारीवरुन डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.