गर्दीमुळे उल्हासनगर-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

गर्दीच्या रेटयामुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

Updated: Aug 29, 2019, 06:45 PM IST
गर्दीमुळे उल्हासनगर-विठ्ठलवाडी दरम्यान लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, कल्याण : गर्दीच्या रेटयामुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. सकाळी ७ वाजल्याचा सुमारास कल्याणहून अंबरनाथ येणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. राकेश साकेत असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

साकेत उत्तर प्रदेशहुन कल्याण रेल्वे स्थानकात आपल्या बहिणी सोबत आला होता. त्यानंतर त्यांनी अंबरनाथला येण्यासाठी कल्याणहून लोकल पकडली होती. मात्र लोकलमध्ये असलेल्या गर्दीच्या रेटयामुळे तो विठ्ठलवाडी-उल्हासनगर स्थानकादरम्यान खाली पडला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी साकेतला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला कळव्याच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मध्य रेल्वेकडून मात्र काहीही नवीन उपाययोजना होताना दिसत नााही. मध्य रेल्वे या अनेकदा उशिरा धावत असतात. त्यामुळे गर्दी आणखी वाढते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांकडून अनेक मागण्या होत आहेत. पण अजून काहीही घडलेलं नाही. मध्य रेल्वेवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्य़ाची गरज आहे. तसेच आणखी एक नवीन लाईन सुरु करण्याची देखील गरज आहे. 

पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. पण रेल्वे मंत्रालयाकडून याची कधीच गंभीर दखल घेतली गेली नाही. जो पर्यंत काही मोठी घटना किंवा अपघात होत नाही. तो पर्यंत रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही.