आजारांविरोधात उपयोगी ठरतोय काळा गहू, विदर्भात पीक येणार जोमात

 काळ्या रंगाचा गहू म्हटलं तर तुम्हाला काहीसं आश्चर्य वाटेल.

Updated: Feb 11, 2021, 04:33 PM IST
आजारांविरोधात उपयोगी ठरतोय काळा गहू, विदर्भात पीक येणार जोमात title=

जयेश जगड, अकोला : एरव्ही गहू म्हटलं की पिवळा रंग आपल्या डोळ्यासमोर येतोय. मात्र, काळ्या रंगाचा गहू म्हटलं तर तुम्हाला काहीसं आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरंय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात काळ्या रंगाच्या गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलीये. हा काळा गहू आरोग्यासाठी अतिशय पोषक आहे. कापसानंतर आता गहूसुद्धा नव्या रंगात पहायला मिळणारेय. अन यातूनच पिवळा गहू चक्क काळ्या रंगात मिळणारेय. काळ्या गव्हाची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. 

काळ्या रंगाचा हा गहू अत्यंत गुणकारी असल्याचा दावा केला जातो आहे. अकोला जिल्ह्यात या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातल्या अकोलखेडमधल्या काही शेतकर्‍यांनी काळ्या गव्हाच्या पिकाचा प्रयोग शेतात केला आहे. दोन एकर शेतात काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. 

काय आहेत फायदे?

काळ्या गव्हावर मावा, तुडतुडे येत नाहीत. 
काळ्या गव्हाच्या जमिनीखालच्या बुंध्याला नैसर्गिक आपत्तीमुळे हानी होत नाही
काळा गहू रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, ह्रदयरोगाविरोधात गुणकारी असल्याचा दावा करण्यात येतो
राजस्थान,पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेशात या गव्हाचं उत्पादन घेतलं जातं

काळ्या गव्हाच्या पेरणीचा खर्च हा सामान्य गव्हापेक्षा कमी आहे. काळ्या गव्हासाठी एकरी ७ ते ८ हजार रुपये खर्च येतो. त्यावर कुठलाही रासायनिक फवारा करण्याचाही गरज नाही. काळ्या गव्हाचा हा प्रयोग महाराष्ट्रासाठी थोडा नवा आहे. त्याचे गुण लक्षात घेतले तर भविष्यात हा काळा गहू खाणा-यांनाही आणि पिकवणा-यांनाही फायद्याचा ठरु शकतो.