शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपचे इच्छुक उमेदवार रमेश कराड हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र आता ही जागाच भाजपाने शिवसेनेला सोडली आहे. त्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुळात लातूर जिल्ह्यातील ६ पैकी लातूर शहर आणि औसा या दोन जागा शिवसेनेने मागितल्या होत्या. मात्र त्याऐवजी लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. रमेश कराड हे २००९ आणि २०१४ असे सलग दोन वेळेस भाजपतर्फे लातूर ग्रामीण मधून भाजपचे उमेदवार होते.
काही महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीटही मिळविले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला न सांगता रमेश कराड यांनी निवडणुकीतून माघारी घेत भाजपात घर वापसी केली होती.
आता सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र आश्चर्यकारकरित्या लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला सोडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेले रमेश कराड हे आता बंडखोरी करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर लातूर ग्रामीण मधून शिवसेनेने नवख्या असणाऱ्या सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना थेट पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण मधून आता काँग्रेसचे घोषित उमेदवार धीरज विलासराव देशमुख आणि शिवसेनेचे सचिन देशमुख यांच्यात लढत होणार आहे. मात्र रमेश कराड हे बंडखोरी करतात का अपक्ष म्हणून उभे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.