मुंबई : महाविकास आघाडी सरकारने ओबीसी (OBC) समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणले असा आरोप भाजपाच्या (BJP) वतीने करण्यात आला आहे. याचा निषेध म्हणून येत्या 26 जूनला भाजपाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास एक हजार ठिकाणी एकाच दिवशी हे आंदोलन होईल. आंदोलनाची पूर्ण तयारी झाली असून, प्रत्येक तालुक्यातील मुख्य चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे
पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. वेळकाढूपणा काढणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी तसंच ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून संपूर्ण महाराष्ट्राभर 26 जूनला भाजप चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
ओबीसी आरक्षणसाठी काँग्रेसनंही (CONGRESS) उद्या आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (NANA PATOLE) यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय. सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. पण केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली होती, पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याचा दावा पटोले यांनी केलाय.