मुंबई - गोवा महामार्गावरील नवीन टोल नाक्याला भाजप कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे

Mumbai-Goa highway Toll Naka​ : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरु आहे. त्याआधीच सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील टोल नाका सुरु करण्यात आला. या टोल नाका कार्यालयाला जमीनधारकांनी आज भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या मदतीने टाळे ठोकण्यात आले.

Updated: May 27, 2022, 02:58 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील नवीन टोल नाक्याला भाजप कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे title=

सिंधुदुर्ग : Mumbai-Goa highway Toll Naka : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे. तर काही ठिकाणी प्रगतीपथावर आहे. मात्र, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील टोल नाका सुरु होण्याआधीच वादात सापडला आहे. टोल नाका कार्यालयाला जमीनधारकांनी आज भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांच्या मदतीने टाळे ठोकले.

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली ओसरगाव येथे हा टोलनाका आहे. आजपासून हा टोलनाका सुरु करण्यात येणार होता. त्यामुळे काल दुपारी अचानक त्याची ट्रायल घेण्यात आली होती. महामार्गाचे काम अजूनही प्रलंबीत असताना टोल सुरू करण्याची घाई का, असा सवाल काल सिंधुदुर्गवासीयांकडून करण्यात आला होता.

वाढता विरोध पाहून सायंकाळी टोल घेणे थांबवण्यात आले होते. आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्क्यावर धडक देत तेथील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे लावलेले फलक ही फाडून टाकले. टोल नाका सुरु होत आला तरी काही जमीन मालकांना पूर्ण मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे काही जमीन मालकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलनात उडी घेतली. त्यांनी टोल कार्यालयात जात गेटला टाळे ठोकले. एवढा विरोध होत असताना हा टोल नाक पुन्हा सुरु होणार का, याची उत्सुकता आहे.

दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावर टोल नाके उभारुन टोल वसूल केला जाणार आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल नाका प्रायोगीक तत्वावर सुरु करण्यात आला. मात्र, सुरु होण्याआधीच वादात अडकला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा हा डोंगरी विकासामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे येथे टोल नको. जबरदस्तीने ते लादण्याचा प्रयत्न केल्यास टोल नाके उखडून फेकून देऊ, असा  इशारा चिपळूण येथील अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवले आहे.  त्यामुळे आता टोल नाक्याचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.