उल्हासनगर गोळीबार प्रकरण; आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत भाजप मोठा निर्णय घेणार?

Mumbai Latest News: सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यात उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

Updated: Feb 5, 2024, 04:55 PM IST
उल्हासनगर गोळीबार प्रकरण; आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत भाजप मोठा निर्णय घेणार? title=

Ganpat Gaikwad Latest News: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे आता राजकारण चांगलंच तापल आहे. गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला. याशिवाय गायकवाड यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यावरुनच शिंदे गट आक्रमक झाला आहे.  आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत भाजप मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

शिंदे गटाच्या मंत्र्यांनी  फडणवीसांवर दबाव टाकला

शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे केली.  शिंदे गटाच्या मंत्र्यांनीच आता फडणवीसांवर दबाव टाकला. तेव्हा देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाडांवर काय कारवाई करणार? कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मात्र, गणपत गायकवाडांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.. कारण त्यांची आमदारकीच रद्द होण्याची शक्यता आहे. 

गायकवाडांची आमदारकी जाणार?  

गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची माहिती विधीमंडळाला प्राप्त झालीय. कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर विधीमंडळ पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या कारवाईमुळे गणपत गायकवाडांची आमदारकीच रद्द होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एकाच प्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यास आमदारकी, खासदारकी तातडीने रद्द केली जाते. आमदारकी रद्द करण्याचे आदेश विधीमंडळ आणि संसदेतून काढले जातात. अनेक प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान दिलं जाते.  अशा परिस्थितीत आमदारकी किंवा खासदारकी रद्द केली जात नाही. विधीमंडळ किंवा संसदेने आदेश काढल्यास संबंधित सदस्यांना आपलं पद कायम ठेवता येतं.

गणपत गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहेत. अजून त्यांना कोर्टाने शिक्षा ठोठावलेली नाही. मात्र, शिक्षा ठोठावल्यानंतर विधीमंडळ लगेच आमदारकी रद्द करण्याचे आदेश काढू शकतं. काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. तेव्हा गणपत गायकवाडांची आमदारकी राहणार की जाणार याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय.

उल्हासनगरमध्ये नेमकं काय घडलं?

उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटीलवर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले. गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. गायकवाड यांच्यासह तिन्ही आरोपींना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची कबुली गायकवाड यांनी दिलीय...5 गोळ्या झाडल्याचा मला पश्चाताप झालेला नाही अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर झी 24 तासला दिली.