निवडणुकीपूर्वी गुहागर मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई?

गुहागर हा कोकणातील सर्वाधिक चर्चिला जाणारा मतदारसंघ ठरत आहे.

Updated: Sep 23, 2019, 05:13 PM IST
निवडणुकीपूर्वी गुहागर मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई? title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघ हा कोकणातील सर्वाधिक चर्चिला जाणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे युती झाल्यास हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडेल याकडे कार्यकर्त्यांच लक्ष लागलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघावर शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष दावा करत आहेत. 2009 मध्ये युती झाल्यानंतर हा मतदारसंघ रामदास कदम यांच्यासाठी शिवसेनेच्या पदरात पडला. त्यामुळे तत्कालीन भाजपचे आमदार विनय नातू यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. आणि फायदा झाला तो राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांचा. 

2014 ला सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा भास्कर जाधवांची लॉटरी लागली. आता भास्कर जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे.

भास्करराव जाधवांच्या प्रचारादरम्यान मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता करू असं सांगत रामदास कदम यांनी थेट डॉक्टर विनय नातू यांनाच आव्हान दिलं आहे.

गुहागर हा जिल्ह्यातील भाजपचा एकमेव मतदारसंघ असून मुख्यमंत्र्यांनी कामा लागा असे आदेश दिल्याचं डॉक्टर विनय नातू यांच्याकडून सांगण्यात आलं. 

शिवसेनेच्या सहदेव बेटकर यांनी नुकतीच जयंत पाटील आणि सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यामुळे कुणबी समाजाचे असल्यामुळे बेटकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.