नीतेश राणेंकडून गरिबांसाठी मोफत 'कमळ थाळी'

जनतेची उपासमार होवू नये म्हणून नीतेश राणेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.   

Updated: Apr 14, 2020, 03:43 PM IST
नीतेश राणेंकडून गरिबांसाठी  मोफत 'कमळ थाळी' title=

सिंधुदुर्ग : भाजपाचे आमदार नीतेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात 'कमळ थाळी' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हातावर बोट असणाऱ्यांचे आणि गरिबांचे मोठे हाल होत आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन पुढे ढकलला आहे. त्यामुळे जनतेची उपासमार होवू नये म्हणून नीतेश राणेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही घोषणा केली आहे. 'कणकवली शहरात आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सहकार्याने उद्यापासून रोज १५० लोकासाठी 'कमळ थाळी ' सुरू करत आहोत. ही थाळी विनामुल्य असणार आहे. मला विश्वास आहे या संकटाच्या काळात गरिबांना  "कमळ" थाळीमुळे नक्कीच मदत होईल!' असा विश्वास त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. 

नीतेश राणेंकडून सुरू करण्यात येणाऱ्या थाळीमध्ये २ मूद भात, २ चपाती, १ वाटी वरण/डाळ (आमटी), १ भाजी या पदार्थांचा समावेश असणार आहे. लक्ष्मी विष्णू हॉल, विद्यानगर (संजीवन हॉस्पिटलजवळ), कणकवली येथे दुपारी १२ ते २ या वेळेत ही थाळी मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात हातावर पोट असणाऱ्यांचा आणि गरिबांच्या एक वेळच्या जेवनाचा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.