भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट

कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पीडित ग्राहकांसोबत ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. 

Updated: Jul 24, 2023, 10:39 PM IST
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट   title=

Kirit Somaiya :  भाजपचे (BJP) नेते  किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. आंबिवली येथील नेपचून स्वराज्य प्रकल्पाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची  मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या गृह प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे.  

नेपच्यून डेव्हलपर्सच्या रामराज्य, स्वराज या कल्याण जवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या गैरव्यवहारात भागिदार बांधकाम व्यावसायिकांच्या सोबत काही बँकाही सहभागी असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकल्पात घर घेणाऱ्या 4000 निम्न मध्यमवर्गीय ग्राहकांची प्रचंड मोठी फसवणूक झाली असून घर ताब्यात न येताही अनेक वर्षांपासून त्यांचे बँकांचे हप्ते कापले जात आहेत. या सर्व पिडीत घर खरेदीदारांना न्याय मिळावा आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी किरीट सोमय्यानी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली.

किरीट सोमय्या यांच्यासोबत काही पीडित ग्राहक सुद्धा उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देतांनाच बँकांचा सहभाग लक्षात घेता दिल्लीत जाऊन अर्थ विभागाचे अधिकारी आणि अर्थ मंत्र्यालयातही भेट घेणार असल्याच त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडेही याचा पाठपुरावा करणार असून पीडितांना न्याय मिळेपर्यंत याचा पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला.

आंबिवली येथे रेरा कायद्यान्वये राज्यात पहिली कारवाई 

बिल्डरांच्या त्रासातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या रेरा कायद्यान्वये राज्यात पहिली कारवाई झाली होती. कळव्यात राहणाऱ्या निखिल साबळे यांनी आंबिवलीच्या कांबार कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू असलेल्या फाल्को वर्ल्ड या प्रकल्पात २ बीएचके फ्लॅट बुक केला. या फ्लॅटचा ताबा 2015 पर्यंत देण्याचं आश्वासन बिल्डर रोहित शुराणी यांनी दिलं होतं. मात्र ते पूर्ण झालं नाही. याबाबत निखिल साबळे यांनी बिल्डरला विचारणा करत अतिरिक्त वेळेचं घरभाडं आणि व्याजाची मागणी केली होती. मात्र, त्याला बिल्डरनं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं निखिल यांनी 2017 साली महारेराकडे धाव घेतली होती. महारेरानं बिल्डरला साबळे यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते, मात्र याविरोधात बिल्डरनं रेव्हेन्यू ट्रिब्युनलमध्ये धाव घेतली. पण तिथे त्याची याचिका पहिल्याच दिवशी फेटाळून लावण्यात आली. यानंतर मात्र महारेरानं जिल्हाधिकाऱ्यांना साबळे यांचा फ्लॅटचा लिलाव करून व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते.