एकनाथ खडसे, आशिष देशमुखांची दांडी; पक्षाकडून दोघांना नोटीस

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि दुसरे नाराज आमदार आशिष देशमुख आज नागपुरात असूनही संघाच्या मुख्यालयात आले नाहीत. त्यामुळे नागपुरात राजकीय चर्चा गरम झालेय.

Updated: Dec 20, 2017, 03:18 PM IST
एकनाथ खडसे, आशिष देशमुखांची दांडी; पक्षाकडून दोघांना नोटीस title=

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि दुसरे नाराज आमदार आशिष देशमुख आज नागपुरात असूनही संघाच्या मुख्यालयात आले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं, तरी कामकाज सुरू होण्याच्यावेळी आशिष देशमुख विधीमंडळ परिसरात पोहोचले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान, दोघांना पक्षाच्यावतीने नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आरएसएसचे भाजपसाठी बौद्धीक मंथन, खडसे आणि देशमुखांची दांडी

देशमुख अजित पवारांसोबत

संघाच्या बौद्धिकाला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली. मात्र, विधीमंडळ आवारात आमदार आपल्याच पक्षाच्या आमदारांसोबतच प्रवेश करतानाचं दररोजचं चित्र दिसतं. आज विधीमंडळ परिसरात आशिष देशमुखांनी प्रवेश केला तो राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत.

राजकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं तक्रारीचं पत्र, त्यानंतर नागपुरात सहा आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी, त्यापाठोपाठ संघ मुख्यालयातील बौद्धिकाला दांडी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत विधीमंडळात प्रवेश. या सगळ्या गोष्टी सांकेतिक मानायच्या का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

दरम्यान, जे आमदार आजच्या बौद्धिकाला गैरहजर होते, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं. नागपूर अधिवेशनात दरवर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं जाते. आजही या आमदारांसाठी बौद्धिकाचं आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी खडसे आणि देशमुख यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.