भाजपने आपल्या आधीच्या भूमिकेत केला बदल

भाजपने आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Updated: Feb 15, 2020, 10:28 PM IST
भाजपने आपल्या आधीच्या भूमिकेत केला बदल  title=

नवी मुंबई : राज्य कार्यकरणीमध्ये भाजपने (BJP) आपली भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच पुन्हा सत्तेत येऊ, अशी याआधी भाषा भाजपचे नेते करत होते. मात्र नवी मुंबई (Navi Mumbai) इथे सुरू असलेल्या पक्ष कार्यकारणीमध्ये भाजपने भूमिका बदलली आहे. आता सरकार कधी पडेल याची वाट न बघता विविध मुद्द्यांवर संघर्ष करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना कार्यकारणीमध्ये करण्यात आल्या आहेत. 

भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम - विनोद तावडे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच यापुढच्या निवडणुकांमध्ये एकटे लढण्याची मानसिकता ठेवण्याचा कार्यकारणीमध्ये सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, भाजपने महाविकास आघाडीचे सरकार फार काळ सत्तेत टिकणार नाही. लवकरच आपण सरकार स्थापन करु, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेत आता भाजपने बदल केल्याचे दिसत आहे.

नवी मुंबईत भाजपच्या मावळत्या कार्यकारिणीची परिषद आज पार पडली. या परिषदेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते विनोद तवाडे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. भाजप आता आक्रमक विरोधी पक्ष म्हणून काम करणार लवकरच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. नवी मुंबई महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढवणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनसेबरोबर (मनसे) युती करणार नसल्याचं तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली असतानाच या प्रकल्पाला आधी विरोध करणाऱ्या भाजप नेते नारायण राणे यांनीही आता प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. भाजपची भूमिका तीच माझी भूमिका असे म्हणत राणेंनी यु टर्न घेतला आहे.