फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

Devendra Fadnavis | Maharashtra BJP | देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येतंय. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची प्रत्येक जिल्ह्यात होळी करण्यात येत आहे.

Updated: Mar 13, 2022, 12:24 PM IST
फडणवीसांना नोटीस पाठवल्याने महाविकास आघाडी विरोधात भाजप आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन title=

मुंबई : पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आता घरीच नोंदवला जाणार आहे. फडणवीसांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. योगेश कुमार गुप्ता हे स्थानिक डीसीपी फडणवीसांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. तिथल्या बंदोबस्ताबाबत आढावा घेतला जातोय. तर दुसरीकडे फडणवीसांच्या चौकशीमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेय आहेत. 

आधी त्यांना बीकेसीमधील सायबर सेलच्या मुख्यालयात पाचारण करण्यात आलं होतं. मात्र नंतर गृहखात्याची बैठक झाली आणि त्यात फडणवीसांच्या मुंबईतील 'सागर' बंगल्यावर जबाब नोंदवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर फडणवीसांनी ट्विटरवरून याबाबत माहिती देत घरीच जबाब नोंदवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. 

या प्रकरणात आपल्याकडे आणखी पुरावे असून सीबीआयकडे तपास दिला तर त्यांच्याकडे पुरावे देऊ असंही फडणवीसांनी म्हंटलंय. दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झालीय. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येत आहे.

फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात येतंय. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची प्रत्येक जिल्ह्यात होळी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 

मुंबईत राम कदम यांच्या नेतृत्त्वात भाजपनं आंदोलन केलं. तर पुण्यातही महापालिकेसमोर भाजपनं आंदोलन केल. नागपुरातही फडणवीसांच्या समर्थनात आंदोलन झालं. या आंदोलनात भाजपचे माजी मंत्री अनिल  बोंडेही सहभागी झाले होते.

ठाण्यातही भाजपने जोरदार आंदोलन केलं. फडणवीसांना आलेल्या नोटिशीची ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी होळी केली. यावेळी बोंबा मारून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

उपराजधनी नागपुरातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसच्या प्रतिची नागपुरात होळी करण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

इंदापुरातही आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन पाटलांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला आहे. बदली घोटाळ्याचा अहवाल लिक झाल्याप्रकरणी आज  देवेंद्र फडणवीसां चौकशी होतेय. 

देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटिशीविरोधात अकोल्यात भाजपने आंदोलन केलं. नोटीशीची होळी करण्यात आली. शहरातील जयप्रकाश नारायण चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार रणधीर सावरकर आणि गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं.. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

पुण्यात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची होळी करण्यात आली. 

फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात सांगलीतही आंदोलन करण्यात आलं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यात झरे इथे नोटिशीची होळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.