खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये

तो ऑर्डर केलेलं जेवण घेऊन आला, पण त्याचा इरादा मात्र वेगळाच होता, महिलेला एकट बघत त्याने...

Updated: Mar 12, 2022, 07:57 PM IST
खायला ऑर्डर करताय, सावधान! ठाण्यात डिलिव्हरी बॉयने लुटले दहा लाख रुपये title=
प्रतिकात्मक फोटो

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : घरी एकटे आहात, भूक लागली आहे, काही खायला ऑनलाईन ऑर्डर करताय, पण सावधान. ठाण्यात ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलेल्या एका तरुणाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने आणि काही रोकड असा एकूण 10 लाखाहून अधिकचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केल्याची घटना घडली आहे.

भर दिवसा ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.

ठाण्यातील नौपाडा इथल्या पाचपाखाडी परिसरातील 39 वर्षीय एका महिलेने घरबसल्या एका साईटवरुन ऑनलाईन खाद्य प्रदार्थ ऑर्डर केले. काही वेळाने डिलिव्हरी बॉय हि ऑर्डर घेऊन महिलेच्या घरी पोहचला. त्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा अंदाज घेत, या डिलिव्हरी बॉयने महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. 

महिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता या डिलिव्हरी बॉयने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चाकूचा धाक दाखवत या डिलिव्हरी बॉयने महिलेला बेडरूममध्ये नेवून कपाटात ठेवलेले सोन्या – चांदीचे आणि हिऱ्याचे दागिने तसंच काही रोक रक्कम असा एकूण 10 लाख 20 हजारांचा मुद्देमाल लुबाडून तिथून पोबारा केला. 

9 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नौपाडा परिसर हा ठाणे रेल्वे स्थानक जवळ असलेला परिसर आहे. अशा शहरी भागात हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिसरात एकच भीतीदायक वातावरण पसरलं आहे. 

घटना घडल्यानंतर महिलेने या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिलेची तक्रार नोंदवून घेतली. तसंच या प्रकरणी सूत्रांचा आणि यांत्रिक यंत्रणांचा वापर करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

अशा प्रकारच्या घटनांपासून वाचण्यासाठी घरी एकट्या असलेल्या महिला आणि वृद्धांनी ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर सतर्कता बाळगली पाहिजे, शक्यतो अनोळखी व्यक्तींना घरात घेऊ नये असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे