Short Form मध्ये 'भाजप' लिहिण्यासाठी योजनेचं नाव बदललं; जनतेच्या पैशातून औषधांवरही जाहिरात

BJP Advertising On Medicine Bottle: पूर्वी या योजनेच्या नावामध्ये परियोजना हा शब्द नव्हता. मात्र 'भा.ज.प' असे संक्षिप्त स्वरुप लिहिता यावे म्हणून या योजनेच्या नावामध्ये संपूर्ण शब्दाचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 13, 2024, 09:31 AM IST
Short Form मध्ये 'भाजप' लिहिण्यासाठी योजनेचं नाव बदललं; जनतेच्या पैशातून औषधांवरही जाहिरात title=
भाजपाची जाहिरात लोकांच्या पैशांमधून केली जात असल्याचा विरोधकांचा आरोप

BJP Advertising On Medicine Bottle: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोदी की गॅरंटी म्हणत अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून जाहिराती केल्या जात आहेत. मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी शक्य त्या माध्यमातून सरकारने केलेली कामं अधोरेखित करण्याच्या उद्देशाने जाहिरातींवर भर दिला जात आहेत. मात्र या जाहिरातबाजीमध्ये अगदी औषधांचाही समावेश केला जात असल्याची बाब समोर आली आहे. अगदी औषधांच्या बाटल्यांवरही भाजपाची जाहिरात केली जात असून यासंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

काय आहे प्रकार

केंद्र सरकारकडून ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना' चालवली जाते. याच योजनेअंतर्गत औषधांचं वाटप केल्या जाणाऱ्या केंद्रावर योजनेचं नाव लिहिताना कल्पकपणे भाजपाचं संक्षिप्त रुप असलेली 'भा.ज.प' ही अक्षरं भगव्या रंगात दाखवली जात आहेत. या माध्यमातून पक्षाचा प्रचार केला जात असून अगदी औषधाच्या बाटल्यांवरही भगव्या रंगात 'भा.ज.प' ही अक्षरं छापण्यात आली आहेत. त्यामुळे आता या छुप्या प्रचारावरुन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन वाद सुरु होण्याची चिन्हं दिसत आहेत. ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना’ नावातील पहिल्या अक्षराला जोडून त्याचेही संक्षिप्त रूप या केंद्रावरील बोर्डावर छापण्यात आलं आहे. त्यामुळे ‘प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना' हे नाव बोर्डावर ‘पी.एम.-भा.ज.प.’ असे दिसत आहे.

बाटलीवरही भाजपचा प्रचार

सदर केंद्रामधून विक्री होणाऱ्या औषधांच्या स्टीकर्सवरही देवनागरीमध्ये योजनेच्या नावातील ‘भा.ज. प.’ ही अक्षरं भगव्या रंगात स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत. उभा रेषेत 'भा.ज.प' ही तीन अक्षरं लिहिलेली आहेत. योजनेच्या नावातील उर्वरित अक्षरं निळ्या रंगात आहेत. तर वरील बाजूस असलेला ‘प्रधानमंत्री’ हा शब्द हिरव्या रंगात आहे. भगवी आणि हिरवी रंगसंगती भाजपा पक्षाच्या झेंड्यातील रंगाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे औषधाच्या बाटलीवरील भगव्या रंगातील ‘भाजप’ हाच शब्द अधिक ठसठशीतपणे दिसून येतो.

'भा.ज.प'साठी तडजोड

याहून अधिक आश्चर्याची बाब म्हणजे आधी या योजनेच्या नावात परियोजना हा शब्दच नव्हता. मात्र योजनेच्या नावातून संक्षिप्त स्वरुपात ‘भाजप’ अशी अक्षरांची जुळवाजुळ व्हावी म्हणून योजनेच्या नावात ‘परियोजना’ या शब्दाचा समावेश करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केला आहे. "सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा हा जनतेच्या करातून येतो. त्यामुळे या पैशातून यापूर्वी अशी जाहिरातबाजी केली जात नव्हती. आता प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जाते. हे योग्य नाही," असं लोंढे म्हणाले आहेत.

सरकारी साठ्यातून पुरवली जातात औषधं तरी भाजपाची जाहिरात का?

या दुकानांना औषधपुरवठा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केला जात असताना अशाप्रकारे एका पक्षाचा प्रचार यामाध्यमातून कसा केला जात आहे असा सवाल उपस्थित होतोय. सदर केंद्रावरील औषधे ही फार्मास्युटिकल्स अॅण्ड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (पीएमबीआय) या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून केला जातो. या केंद्रातून ग्राहकांना कमी किमतीत औषधांची विक्री केली जाते.