एसटी बँकेत सदावर्तेंची सत्ता जाणार? गंभीर आरोप करत 14 संचालकालांनी सोडली साथ

Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी बँकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळवलं होतं. पण आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी निवडून आणलेल्या 19 पैकी 14 संचालकांनी त्यांची साथ सोडली आहे.

प्रताप नाईक | Updated: Nov 24, 2023, 05:51 PM IST
एसटी बँकेत सदावर्तेंची सत्ता जाणार? गंभीर आरोप करत 14 संचालकालांनी सोडली साथ title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. जानेवारी महिन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली होती. बँकेतील संचालकपदाच्या 19 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 19 जागा जिंकल्या होत्या. या निकालाने कामगार संघटनेच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतलेल्या सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे.

एसटी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी डावलून मर्जितील कार्यकर्त्यांना संधी देवून निवडून आणलं होतं. आता त्याचं संचालकांनी सदावर्ते यांना धक्का देण्याची रणनीती आखल्याचे कळतंय. 19 पैकी 14 संचालक सदावर्तेंच्या विरोधात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसटीचे बँकेचे 14 संचालक संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.

सहा महिन्यापूर्वी एसटी बँकेची निवडणूक पार पडली होती. त्यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते याच्या एन्ट्रीमुळे एसटी बँकेच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा झाली. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला धूळ चारत सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजयी केले होते. पण त्यानंतर बँकेच्या कारभारात होणारा अनावश्यक हस्तक्षेप आणि सदावर्ते याच्या मेहुण्याची बँकेत संचालक म्हणून झालेली नेमणूक यामुळे निवडणूक आलेले अनेक संचालक चांगलेच नाराज झाल्याचे कळतंय. त्यामुळे 19 पैकी 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेले असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, सदावर्ते हे समाजात द्वेष पसरत आहेत. सामान्य गरीब एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करत असल्याचा आरोप या चौदा संचालकांचा आहे. नाराज संचालकांनी या संदर्भात जाहीर भूमिका मांडली नसली तरी दोन दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दाखवून हे सर्व संचालक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. तसेच मुंबईत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला केवळ पाच संचालक उपस्थित होते. उर्वरित 14 संचालक हे कोल्हापूरच्या आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती आहे.

दरम्यान, 14 संचालकांनी बंड पुकारल्यामुळे एसटी कर्मचारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मानला जात आहे. नॉट रिचेबल असलेले 14 संचालक सदावर्ते यांच्या विरोधात गेले असून दोन दिवसात कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून कोल्हापूर विभागात संघर्ष निर्माण झाला होता. सदावर्ते यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांला डावलून ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली होती. त्यामुळे नाराज संचालकांच्या मागे नाराज असणारा कोल्हापूरचा सूत्रधार असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांच्यात आहे.