OBC Reservation : महाराष्ट्रातील ओबीसींसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील 15 जातींची ओबीसी यादीत समावेश होणार आहे. या15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आरक्षणाबाबत सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.
महाराष्ट्रातील अनेक ओबीसी जातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची ग्रीन सिग्नल
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.
राज्य सुचीतील क. २२० मध्ये अंतर्भाव असलेल्या बडगुजर, सुर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, व रेवा गुजर या जातींचा अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये नव्याने समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली तसेच राज्य सुचीच्या क. २१६ मधील पोवार, भोयर आणि पवार अशी स्वतंत्र नोंद घेत आयोगाने या ओबीसी जातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास अनुमती दिली आहे.
कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या बेलदार जातीच्या उपजातींचा राज्य सुचीतील क. १८९ मध्ये समावेश असलेल्या जातींचा राज्य सरकारच्या शिफारसीनुसार आयोगाने नव्याने सुधारणा करीत केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे. याबरोबरच राज्य सुचीतील क २६२ अंतर्गत असलेल्या लोध, लोधा व लोधी आणि क २६३ मध्ये समावेश असलेल्या डांगरी या जातीचा सुध्दा राज्य सरकारच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेशास आयोगाने हिरवी झेंडी दाखविली आहे.