कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार?

Big Blow Expected To Uddhav Thackeray In Kokan: "आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना घाबरलो नाही," असंही या नेत्याने लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 9, 2024, 10:41 AM IST
कोकणात लोकसभेपूर्वीच मोठा राजकीय भूकंप? राणेंमुळे 'हा' नेता ठाकरेंची साथ सोडणार? title=
उद्धव ठाकरे गटला मोठा फटका बसणार

- कृष्णा पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये खलबत सुरु आहेत. एकीकडे जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या गटाला कोकणामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील एक प्रमुख आमदार आणि नेते भारतीय जनता पार्टीत असलेल्या राणे कुटुंबियांसंदर्भातील प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. हा बडा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार की काय अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाली आहे. असं असतानाच आता या नेत्याने आपल्याबरोबर विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं म्हणत समर्थकांना एक पत्र लिहून 'मनातील बोलायचं आहे, खंत व्यक्त करायची आहे' म्हणत कार्यकर्त्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे.

कोण आहे हा नेता?

उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते आणि ठाकरे कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे भास्कर जाधव हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगलं आहे. निलेश राणेंबरोबर झालेल्या वादाची दखल पक्ष नेतृत्वाकडून घेतली गेली नसल्याने भास्कर जाधव हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच इतरही काही कारणं यामागे आहेत. याचसंदर्भात बोलण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मनातली खंत व्यक्त करण्याच्या हेतूने चर्चेसाठी बोलावलं आहे. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण करण्यात आल्याचा उल्लेखही भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाठवलेल्या संदेशात केला आहे.

42 वर्ष सातत्याने राजकारणात

"आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात. अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात. तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रूपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरूपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून राना-वनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी व शिवसेना वाढविण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्ष सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय," असं भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..'; खळबळजनक खुलासा

जीवनातून संपवून टाकण्याची भाषा

"आज वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धव ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत. आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जात आहे," असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. राणेंच्या एका सभेमध्ये भास्कर जाधवांविरुद्ध हे विधान करण्यात आलं होतं.

विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे

"अशातच 40 वर्षांपासूनचे माझे जुने-जाणते वयोवृध्द तसेच नवीन व ताज्या दमाचे सहकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांचा पाठिंबा पाहिल्यावर माझा उर भरून येतो व आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे, ही उर्जा मिळते," असं भास्कर जाधव समर्थकांचे आभार मानता म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> 'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा

चला बोलूयात...

"मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे. पण, या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मनात काही खंत आहेत, त्याही उघड करायच्या आहेत. यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे. सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवार दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल, चिपळूण येथे एकत्र येऊया. आपल्या मनातील बोलूया आणि प्रेमाचे दोन घास एकत्र खाऊया. मी आपली वाट पाहतोय..!" असं म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे. ऐन लोकसभेआधी भास्कर जाधवांसारख्या नेत्याने साथ सोडली तर उद्धव ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.