Loudspeaker row: भोंग्याचा वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनसेने पाहा काय म्हटलं...

 Bhonga vs Hanuman Chalisa: भोंग्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे.  

Updated: Apr 25, 2022, 10:04 AM IST
Loudspeaker row: भोंग्याचा वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनसेने पाहा काय म्हटलं... title=

मुंबई : Bhonga vs Hanuman Chalisa: भोंग्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. मनसेकडून बाळा नांदगावकर बैठकीला जाणार आहेत. 

भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर राहणार आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा मनसेने राज्य सरकारला दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाने तात्काळ सर्वपक्षीय बैठक आमंत्रित केली आहे. 

सर्व पक्षांचे दोन प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भोंग्याबाबत राज्य सरकारकडून सर्वच प्रार्थनास्थळांसाठी लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे. मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याआधी गृहविभागाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरेंनी दिला अल्टिमेटम

राज्यातील भोंगाचा मोठ्या आवाजाचा उल्लेख करुन, विशेषत: मशिदींमधून अजानच्यावेळी  (Azaan Row) भोंगा वाजतो. हे भोंगे 3 मे पर्यंत पूर्णपणे उतरविण्यात यावेत, असा स्पष्ट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  राज्य सरकारला दिला आहे. तसे न झाल्यास जे काही घडले त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे ते म्हणालेत.

दरम्यान, राज्यात भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा असे चित्र दिसून येत आहे. मनसेने जिथे भोंगा वाजेल तिथे हनुमान चालीसा असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. या बैठकीत तोडका निघणार का, भोंग्याबाबतची कोंडी फुडणार का, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.