Bhatakati Atma Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना उद्देशून 'भटकती आत्मा' असा टोला लगावला. तर पवारांनीही त्यावरून मोदींना चांगलंच सुनावलंय... भटकती आत्मावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कसे वार-पलटवार सुरू झालेत, याबद्दल जाणून घेऊया.
कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना राजकीय गुरू म्हणायचे... मात्र पुण्यातल्या सभेत त्यांनी पवारांचा उल्लेख चक्क भटकती आत्मा असा केला. पवारांमुळं महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केला. त्यावरून आता पवारांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. होय मी भटकती आत्मा आहे, जनतेसाठी शंभर वेळा अस्वस्थ राहीन...असं त्यांनी सुनावलं.
भटकती आत्मावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वार-पलटवार सुरू झालेत. गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, असा टोला संजय राऊतांनी लगावला. तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला.
दुसरीकडं पंतप्रधान मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदींनी कुणाचं नाव घेतलेलं नाही, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला.
ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी विरुद्ध पवार असा संघर्ष उफाळून आलाय. अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपनं पहिली लढाई जिंकली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह गेल्यानं पवार दुसरी लढाईही हरले. आता बारामतीतच पवारांची कन्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रणमैदानात उतरल्यात.. पवार विरुद्ध पवार वादात मोदींनी उडी घेतल्यानं बारामतीची लढाई आणखीच अटीतटीची होणार आहे.