भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर

तुमच्या घरी देखील भारत गॅस वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 23, 2017, 05:46 PM IST
भारत गॅसच्या निष्काळजीपणाचा कहर  title=

मुंबई : तुमच्या घरी देखील भारत गॅस वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. 

डोंबिवलीतील पीएनटी परिसरात भारत गॅसच्या निष्काळजीपणामुळे अपघात होता होता टळला आहे. भारत गॅसच्या सिलेंडरमध्ये गळती असल्याचं समोर आलं आहे. यावेळी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेची माहिती भारत गॅसला देता त्यांनी ग्राहकांचीच चूक असल्याचं सांगितलं 

नेमकं काय प्रकार घडला?

या परिसरातील समिक्षा माऊली सोसायटीतील सुरेंद्र गवळी यांनी बुधवारी भारत गॅसचा सिलेंडर बुक केला. गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास भारत गॅसचा कर्मचारी सिलेंडर घेऊन आला. त्यावेळी घरी ३ महिला आणि लहान बाळं होतं. रोजच्या सवयीनुसार घरातील महिलांनी जुना सिलेंडर देऊन नवीन सिलेंडर घेतला. 

काहीवेळाने सुरेंद्र गवळी घरी आले असता त्यांना गॅसचा वास येऊ लागला. कोणत्या सिलेंडरला वास येत आहे याची तपासणी केल्यावर त्यांना काही वेळापूर्वी आणलेल्या सिलेंडरमध्येच गळती असल्याचं समोर आलं. लगेच प्रसंगावधान राखून तो सिलेंडर घरातून बाहेर काढून डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील भारत गॅस एजन्सीमध्ये फोन करून तक्रार नोंदवली. आणि ताबडतोब सिलेंडर बदलून देण्याची मागणी केली. आणि तेथे अपघात होता होता टळला. 

या संदर्भात झी चोवीस तासने त्या भारत गॅस एजन्सीसोबत संपर्क साधला असता. एजन्सीचे मॅनेजर सुशील महाजन यांच्याकडून फार थंड प्रतिक्रिया मिळाली. गॅस गळती आम्हाला माहित नव्हती. अशा पद्धतीने गॅस दिला गेला याची आम्ही चौकशी करू. आणि त्यांना तो गॅस बदलून देऊ अशी वेळ काढून उत्तरे दिले. मात्र त्या गॅस एजन्सीच्या मॅनेजर महाजन यांना प्रसंगाचं गांभीर्य नाही हे लक्षात आले. या संदर्भात ग्राहक सुरेंद्र गवळी यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे. 

अशा पद्धतीने ओळखली सिलेंडर गळती 

सुरेंद्र गवळी यांना गॅस गळतीचा वास येताच. नवीन आणलेल्या गॅस सिलेंडरच्या तोंडाजवळ साबणाच्या पाण्याचा फेस नेला. हा फेस जवळ घेऊन गेला असता तिथे बुडबूडे निर्माण झाले. याचा अर्थ त्या सिलेंडरमधून गॅस गळती होत होती. ही गळती सिलेंडरच्या नॉबच्या बाहेरील बाजूस होती. या ठिकाणी सहसा ग्राहक लक्ष देत नाहीत. किंवा ते चेक करत नाहीत. त्यामुळे सिलेंडर घरी आल्यावर ही काळजी नक्की घ्याल.

ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना नेमकी कोणती काळजी घ्याल?

१) गॅस सिलेंडर घेऊन एजन्सी कर्मचारी घरी आल्यावर सर्वात प्रथम त्यांच्याकडून सिलेंडर तपासून घ्यावा. सिलेंडरवर असणारे गॅसचे वजन आणि त्यावर असणारा नंबर चेक करावा. 

२) सिलेंडरवर A,B,C,D अशी अक्षर असतात. याचा अर्थ असतो सिलेंडरची मुदत असते. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, B म्हणजे एप्रिल, मे, जून, C म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असा होतो. त्यापुढे वर्ष देखील लिहीले असते.
उदाहरणार्थ - D 22 म्हणजे हा सिलेंडर तुम्ही डिसेंबर २०२२ पर्यंत वापरू शकता. 

३) तसेच सिलेंडर घरी आल्यावर फक्त नॉब वरून चेक न करता त्याच्या बाजूने देखील तपासून घ्यावा. पिवळ्या रंगाच्या पट्टीबाहेरून देखील काळजीपूर्वक सिलेंडर तपासावा.