MLA disqualification Aaditya Thackeray Instagram Story: महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला घाना देशाचा दौरा रद्द केला आहे. राज्यामधील ऐतिहासिक सत्तासंघर्षातील आमदार अपात्रतेचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच राहुल नार्वेकर घानाला जाणार असल्याचा मुद्दा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरत होता. या दौऱ्याला उद्धव ठाकरे गटाने विरोधही केला होता. घाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय संसदीय परिषदेसाठी नार्वेकर जाणार होते. मात्र अचानक त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. याचसंदर्भातील एक पोस्ट आदित्य ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन केली आहे. यामध्ये त्यांनी माझ्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून नार्वेकरांनी दौरा रद्द केल्याचा दावा केला आहे.
राहुल नार्वेकर हे 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरदरम्यान घाना देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र सध्या राज्यात शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर नार्वेकरांसमोरच सुनावणी सुरु आहे. मागील आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरामध्ये या प्रकरणाची सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. असं असतानाही नार्वेकर घानाला जाणार असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने नार्वेकर तारखांवर तारखा देत मुद्दाम हे प्रकरण लांबवत असल्याचंही आरोप केला होता. याचा साऱ्या पार्श्वभूमीवर अचानक नार्वेकरांनी घानाचा दौरा रद्द केला आहे. यासंदर्भातील बातमीचं कात्रण आदित्य ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केलं आहे.
"या राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय माझ्या ट्वीटनंतर घेतला आहे," असं आदित्य यांनी इन्स्टाग्राम स्टोरीत नार्वेकरांचा दौरा रद्द झाल्याची बातमी शेअर करत म्हटलं आहे. "ते (नार्वेकर) येथील गद्दार आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी लांबवणीवर टाकून घाना येथे होणाऱ्या राष्ट्रीय संसदीय परिषदेसाठी होते. यावरुन मी केवळं इतकं विचारलं होतं की महाराष्ट्रातील लोकशाहीचा गळा घोटून संसदीय परिषदेसाठी जाणं हा विरोधाभास नाही का?" असंही आदित्य ठाकरेंनी इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तुम्हीच पाहा त्यांची इन्स्टाग्राम स्टोरी...
आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीचं वेळापत्रक देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. यानुसार नार्वेकर यांनी 2 महिन्यांचं वेळापत्रक दिलं आहे. याविरोधात ठाकरे गटाने अपात्रतेच्या मुद्द्याऐवजी इतर विषांमध्ये वेळ काढून आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला विलंब करण्याचा प्रकार असल्याचा दावा करणारं प्रतिज्ञापत्र ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं आहे. यावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.