भंडारा दुर्घटना : राज्यातील रूग्णालयांचे ऑडिट करण्याचे अजित पवार यांचे आदेश

 भंडारा (Bhandara) जिल्हा रूग्णालय (Bhandara District Hospital) आगीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  राज्यातल्या सर्व रूग्णालयांचे ऑडिट (audit all hospitals) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.

Updated: Jan 9, 2021, 01:38 PM IST
भंडारा दुर्घटना : राज्यातील रूग्णालयांचे ऑडिट करण्याचे अजित पवार यांचे आदेश   title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : भंडारा (Bhandara) जिल्हा रूग्णालय (Bhandara District Hospital) आगीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाने पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यातल्या सर्व रूग्णालयांचे ऑडिट (audit all hospitals) करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.

भंडाऱ्यातील अपघानंतर प्रशासन खडबडून जागं झाले आहे. ही दुर्घटना कशामुळे घडली त्याची उच्च स्तरीय चौकशी केली जाणार आहे. तसेच राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचे ऑडिट करणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. या घटनेनंतर तात्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) हे खास हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर अशा घटना होऊ नये, म्हणून काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या इलेक्ट्रीक ऑडीटची मागणी वारंवार करूनही ऑडीट करण्यात आले नाही, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भंडारा रूग्णालय आगीची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पीडितांना १० लाखांची मदत जाहीर करा अशी मागणी फडणवीसांनी केली. जिल्हा सामान्य रूग्णालयात दुर्घटना घडली तेव्हा तिथे दोन नर्स आणि सहाय्यक कर्मचारी असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. 

राज्याला हादरवणारी घटना भंडाऱ्यात घडली. जिल्हा सामान्य रूग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. या आगीतून ७ बालकांना वाचवण्यात आलंय. पण १० बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री २ वाजता ही आग लागली. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आऊटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आले.

त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दरवाजा उघडून पाहिला असता खोलीत मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. या आगीत आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली सात बालकं वाचवण्यात आली. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० बालकांचा मृत्यू झाला.