भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी

Bhandara Accident : भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात 200 नागरिक जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत रस्त्यावर सोडून पळ काढला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 25, 2023, 11:45 AM IST
भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह रस्त्यावर सोडून पळ काढावा लागला आहे. आधीच मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या कुटुंबावर या हल्ल्यानंतर आणखी एक मोठा आघात झाला आहे.

भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यात सालई शिवारात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शुभम भोयर याच्या अंत्ययात्रेत हा सगळा प्रकार घडला. अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांवर बाम्हणी स्मशानघाटात मधमाशांनी अचानक प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात सुमारे 200 नागरिक जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सामील नागरिकांनी सैरावैरा धूम ठोकली. तिरडी घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी शेवटी प्रेत खाली ठेवून नदीत उडी मारून मधमाशांपासून आपली सुटका करून घेतली आहे.

शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा स्वगावी बाम्हणी येथे रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशान घाटावर नेण्यात आली होती. त्यावेळी अचानक मधमाशांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात नागरिक पळू लागले.

या मधमाशांच्या हल्ल्यात सुमारे दोनशे नागरिक जखमी झाले आहेत. तिरडी घेऊन जाणारे पाच ते सहा नागरिकांवरही मधमाशांनी हल्ला केला. त्यावेळी काय करावे हे त्यांना कळलेच नाही. अखेर स्वतःचा जीव वाचवण्याकरीता त्यांनी तिरडी खाली ठेवून थेट वैनगंगा नदी पात्रात उडी मारली. दरम्यान काही युवकांनी हिम्मत करून शुभमचे प्रेत तिरडीसह चितेजवळ आणलं आणि त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार रविवारी घडला आहे.  पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला.  लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे मोठी पळापळ सुरु झाली होती. गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून गेले.