बीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय?

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सीआयडीने आरोपींच्या स्कॉर्पिओमधून दोन मोबाईल ताब्यात घेतले आहेत. असं असतानाच आता या प्रकरणात आज मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 30, 2024, 06:49 AM IST
बीड प्रकरण: ...म्हणून वाल्मिक कराड शरण येणार! एका निर्णयामुळे अडकला; 'त्या' 2 मोबाईलमध्ये काय? title=
सीआयडीच्या तपासाला वेग

Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर वारंवार विरोधकांकडून टीका केला जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड फरार आहे. मात्र खंडणी प्रकरणात फरार असणारा आरोपी वाल्मिक कराड आज शरण येण्याची दाट शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी ही महिती दिली आहे. आरोपींची बँक खाती गोठवण्यात आल्याने वाल्मिक कराडसमोर शरण येण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. 

...म्हणून वाल्मिक कराड येणार शरण

वाल्मिक कराडसहीत संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामधील अन्य तीन आरोपींची बँक खाती रविवारी गोठवण्यात आली. त्यामुळेच कराड फार दूर जाऊ शकत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. त्याचप्रमाणे पासपोर्टसंदर्भातही कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र वाल्मिक कराडकडे पासपोर्टच नसल्याने तो देशाबाहेरही जाऊ शकत नाही, असे समजते. म्हणूनच पुढील काही तासांमध्ये वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये बीडमधून रविवारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये काही धक्कादायक खुलासे समोर आलेले असतानाच आता या प्रकरणामध्ये एक मोठा निर्णय घेतला गेला. वाल्मिक कराडसहीत एकूण 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. हा वाल्मिक कराड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

150 अधिकारी करत आहेत तपास

सीआयडीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं चित्र पाहयला मिळत आहे. बीडमधील खंडणी अन् सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीची 9 पथकं कार्यरत आहेत. या 9 पथकांच्या माध्यमातून प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. या तपासामध्ये दीडशे अधिकारी अन् कर्मचारी आहेत. फरार आरोपींच्या पासपोर्टविषयीही कारवाई सुरु आहे. केवळ राज्यच नाही तर देशभरामध्ये या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरी ठशांचे निशाण आरोपींबरोबर जुळून आल्याची माहितीही समोर येत आहे.

मोबाईलमधून समोर येणार अनेक रहस्यं

आरोपींच्या स्कार्पिओ कारमध्ये मिळून आलेले अन् जप्त केलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मोबाईल सीआयडीकडून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये नेमकं काय दडलं आहे हे तपासणीनंतर समोर येणार आहे. अद्याप मोबाईलमधील कुठलेही व्हिडिओ अथवा चॅट समोर आले नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील तपासणीनंतरच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला का? व्हिडिओ कॉल केला का? फोन कोणाला केला का? या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांचे आदेश

विशेष तपास पथकाची स्थापना केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाचे आदेश दिले होते. यामध्ये आरोपींची संपत्ती जप्त करण्याबरोबरच ज्यांचे शस्त्रांसहीत फोटो समोर आले आहेत त्यांच्या बंदुकीचे परवाने रद्द करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले होते. याच आदेशांअंतर्गत बँक खाती गोठवण्यात आल्याने वाल्मिक कराडसमोर शरण येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.