बीड : स्वतः कोरोना अनुभवल्यानंतर, कोरोना रुग्णांचे होत असलेले हाल आणि असुविधेबाबत प्रत्यक्षात आलेला वाईट अनुभव इतरांना येऊ नये म्हणून, बीड शहरातील एका व्यक्तीने स्वत:च्या जागेत कोविड रुग्णालय उभारलं आहे. आपल्या लॉनमध्ये त्यांनी शंभर ते दीडशे स्वतंत्र खोल्या असलेलं कोविड रुग्णालय उभं केलं आहे. मागील दीड महिन्यापासून याठिकाणी अनेकांनी कोरोनावर मात केली आहे.
संतोष सोनी हे वैष्णवी लॉन्सचे मालक आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढते आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आणि रुग्णांची सोय होणं अवघड होऊ लागलं. ही बाब संतोष सोनी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या जागेमध्ये कोविड सेंटर सुरु केलं. या कोविड सेंटरमध्ये 125 रुग्ण उपचार घेतात. या सेंटरला सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत पुरवली जात नाही. स्वखर्चातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने हे कोविड सेंटर बीडमध्ये सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे रुग्णांच्या उपचारासाठी लाखो रुपये खासगी रुग्णालयं बिल आकारत असताना, सोनी यांनी केलेल्या सुविधांमुळे बीड शहरातील अनेक रुग्णांना याचा लाभ मिळतो आहे.
हे कोविड सेंटर तयार करण्यासाठी अनेकांनी सोनी यांना सहकार्य केलं आहे. आज शहरातील अनेक संस्था त्यांना मदत करत आहेत. सोनी यांनी दाखवलेल्या समाजाबद्दलच्या बांधिलकीमुळे अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.
मागील महिनाभरापासून हे सेंटर सुरु आहे. यामध्ये अनेकांना जेवण आणि राहण्याची सुविधा मिळत आहे. सर्व रुग्णांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयातील स्टाफ उपलब्ध करण्यात आला आहे. डॉक्टर आणि नर्स या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. सोनी यांची कार्यतत्परता आणि कोरोना संकटात दाखवलेलं भान हे नक्कीच कौतुकास्पद आहे.