शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे

Beed News : बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कांदा विकण्यासाठी सोलापूरच्या मार्केटमध्ये खिशातून पैसे द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 29, 2023, 05:58 PM IST
शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे title=

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढं आता नवं संकट उभा ठाकलंय. इथल्या कांद्याने शेतकऱ्यांच्या अक्षरक्षः डोळ्यात पाणी आणलं आहे.1 रुपया किलो कांदा गेल्याने शेतकऱ्याने, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा बांधावर फेकून दिलाय. त्यामुळे बऱ्याच शेतात कांद्याचा सडा पडलाय. कांदा विकला गेला मात्र उलट मायनसमध्ये पट्टी आल्यानं शेतकरी हवालदील झालाय.

बीडच्या नेकनूर गावातील तरुण शेतकरी वैभव शिंदे यांच्याकडे सात एक्कर शेती आहे. त्यापैकी दोन एकर शेतामध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांना 70 हजार रुपये खर्च आला. यासाठी शिंदे यांनी उसनवार कर्ज घेऊन कांद्याची लागवड केली. लावलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल आणि आपली आर्थिक घडी बसेल. असं स्वप्न वैभव शिंदे यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र रात्री अपरात्री दारे धरून आणि प्रचंड मेहनत घेत तळ हाताच्या फोडासारखा जपून पिकवलेल्या कांद्याला, जेव्हा सोलापूरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेलं, तेव्हा त्याला कवडी मोल भाव मिळाला.

1 रुपया आणि 2 रुपये किलो कांदा विकला. यामुळं पदरात काहीच पडलं नाही. उलट 558 रुपये तेथील आडत दुकानदाराला देण्याची वेळ वैभव शिंदे यांच्यावर आली. कांदा तर गेलाच मात्र एवढी मेहनत घेऊन आडत दुकानदाराला देखील पैसे द्यावे लागले. यामुळे वैभव शिंदे यांनी उर्वरित कांदा आपल्या शेतात आणि शेताच्या बांधावर टाकला. यामुळे आज घडीला मेहनतीने पिकवलेल्या कांद्याचा सडा वैभव शिंदे यांच्या शेतामध्ये पाहायला मिळतोय.

काही महिन्यांपूर्वी देखील कांद्याचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांवर अशीच वाईट अवस्था झाली होती. बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे कांदा सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये बाजारपेठेत चांगला भाव मिळेल या आशेने नेतात. मात्र अनेक वेळा त्यांच्या पदरी निराशा लागत असल्याचं पाहायला मिळते. मागील वर्षभरामध्ये एकदाही कांद्याला चांगला भाव आला नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शेतामध्ये केलेली मेहनत वाया जात असल्यामुळे कांदा पिकवायचा की नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.

शेतीमध्ये काही पिकलं तर काही मिळेल या अपेक्षेवर शेतकरी असतो. मात्र उलट त्याला खिशातून पैसे देण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनावर झालेला आहे. दुसरीकडे शेतकरी धोरण चुकीचे असल्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याचेही पाहायला मिळतंय. ज्या शेतकऱ्यांना आपलं पीक अडतीमध्ये घेऊन गेला त्या शेतकऱ्याला वरून खिशातून पैसे देण्याची वेळ येत आहे. अशा पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होत असलेली थट्टा पाहून खाणाऱ्याच्या नाहीतर पिकवणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येतंय. त्यामुळे आता कांद्याचे उत्पादन घ्यायचं की नाही असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात आहे.