बीड : बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला आहे. प्यायला पाणी आणि जनावरांना चारा नाही. यासाठी झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी कोरड्या धरणात धरणे आंदोलन करीत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची अंत्ययात्रा काढली. प्रशासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना कराव्यात अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. याच मुद्द्यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षाकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. विहिरी आतापासूनच कोरडया पडत असल्याने चिंता व्यक्त आहे. महाराष्ट्र सरकारने २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असला तरी अधिकाऱ्यांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दुष्काळ आहे. कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे. पुढच्या सहा महिन्यांसाठी दुष्काळ जाहीर झाला असला तरी दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपायोजना कधी अंमलात येतील असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.