अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बीडमध्ये (Beed) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं (Menstrual cycle) रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार सुनेच्या तक्रारीनंतर समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune News) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केलाय. ऑगस्ट 2022 मध्ये हा सर्व किळसवाणा प्रकार घडल्याचे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आपण बीडला सासरी गेलो असताना सासू आणि दिराने आपल्यासोबत हा घाणेरडा प्रकार केल्याचे तक्रारदार महिलेने म्हटलं आहे. मासिक पाळीचे रक्त कापसाने टिपून एका बाटलीत जमा केलं आणि मांत्रिकाला 50 हजारांना विकले असे या महिलेने सांगितले. तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी जादूटोणा कायद्यांतंर्गंत गुन्हा दाखल करून हे प्रकरण अधिक तपासासाठी बीड पोलिसांकडे वर्ग केले आहे. तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
"विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या या 27 वर्षीय महिलेचे बीड येथे सासर आहे. 2019 मध्ये या महिलेचा लग्न झाले होते. लग्नानंतर ते फुरसुंगी चंदनगर येथे राहत होते. या महिलेचा पती आणि कुटुंबिय मारहाण आणि शिवीगाळ करत होते. 2021 मध्ये या महिलेने सासू सासरे आणि पतीविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना 2022 मध्ये या महिलेचा पती, सासू सासरे विश्रांतवाडी येथे आले आणि त्यांनी पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून प्रकरण मिटवण्याची विनंती केली. त्यानंतर या महिलेला बीड येथे घेऊन गेले. पती कामावर गेल्यावर महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली. ती महिला अंघोळीला जाताना तिने दरवाजा उघडा ठेवावा यासाठी तिचे सासरे त्रास देत होते," असे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्योधन भापकर यांनी सांगितले.
तीन दिवस निर्वस्त्र केलं अन्...
"पती बाहेर गेलेला असताना 2022 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात या महिलेच्या दिराने तिला मासिक पाळीतील रक्त अघोरी विद्येसाठी पाहिजे असून त्याबदल्यात आपल्याला 50 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले. यावर संतापलेल्या महिलेले तुम्हाला असे काही हवे असल्यास तुमच्या पत्नीकडून घ्या असे दिराला सांगितले. यावर त्या दिराने ज्या महिलेला मुलबाळ नाही अशाच महिलेच्या मासिक पाळीचे रक्त हवे आहे असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला सलग तीन दिवस निर्वस्त्र करुन कुटुंबियांनी मासिक पाळीतील रक्त कापसाने काढून बाटलीत भरले," अशी माहिती पोलीस निरीक्षक दुर्योधन भापकर यांनी दिली.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा लढा बाकी - रुपाली चाकणकर
"पुणे शहरामध्ये सुनेवर बळजबरी करुन मासिक पाळीच्या रक्ताच्या जादूटोण्यासाठी 50 हजार रुपयांसाठी सौदा केल्याची घटना समोर आली आहे. ही अतिशय घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. पुणे हे विद्येचे माहेर घर आणि विद्येच्या माहेरघरात अजूनही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अतिशय घृणास्पद घटना घडतात. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला होता. आता अशा घटना पाहता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा लढा किती बाकी आहे हा प्रश्न पडतो आहे. समाजामध्ये अशा घटना घडू नये म्हणून आम्ही जागृती मोहिम हाती घेतली आहे. पण नागरिकांनीसुद्धा सतर्क राहावं," असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.