दीपक भातुसे/ कर्जत : तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या वाढलेल्या क्रेझचा फायदा उठविण्यासाठी पक्षाच्या आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आणि आक्रमक व्हा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाने दिला आहे.
पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत इथे सुरू असलेल्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिरात दुसऱ्या दिवशी सोशल मीडियाचे महत्त्व आणि त्याचा वापर या विषयावर चर्चा करण्यात आली. सध्या सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असून प्रचाराचे ते मोठे साधम बनले आहे.
मात्र राष्ट्रवादीचे नेते सोशल मिडियावर जास्त अॅक्टिव्ह नाहीत. पक्षाच्या आमदार, खासदार, नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांनी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह होऊन पक्षाच्या पोस्ट आणि ट्विट शेअर, रिट्विट कराव्यात, अशा सूचना या शिबिरात देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून कार्टून, तयार केलेल्या पोस्ट राष्ट्रवादीने तयार करायला सुरुवात केली आहे. त्या पोस्ट व्हायरल करणं, पोस्टवर रिअॅक्ट (व्यक्त) होणं गरजेचं असल्याचंही सांगण्यात आलंय.
राज्यात भाजपनंतर फेसबुकवर राष्ट्रवादी दोन नंबरला असल्याचा दावा पक्षाने केला आहे. फेसबूक, ट्विटरवर अजित पवारांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त फॉलोअर्स फेसबूकवर -अजित पवार यांचे फॉलोअर्स ५ लाख, सुप्रिया सुळे जवळपास ६ लाख (अंदाजे) ट्विटरवर सुप्रिया यांचे फॉलोअर्स १,२१,००० अजित पवार- ४२,०००आहेत. त्यामुळे या माध्यमाचा सुप्रिया सुळे चांगला वापर करत आहेत. नुकतीच त्यांनी ट्विटरवर सेल्फी विथ पॉटहोल्स ही राज्यातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मोहीमही राबवली आहे.