नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय, पोलिसांना अपयश

शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच असल्याचं सध्या चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत खुनाचे तब्बल ६४ गुन्हे दाखल झालेत. आरटीआयअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत ही आकडेवारी समोर आलीय. त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

Updated: Nov 7, 2017, 07:28 PM IST
नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय, पोलिसांना अपयश title=

जितेंद्र शिंगाडे/ नागपूर : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच असल्याचं सध्या चित्र आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत खुनाचे तब्बल ६४ गुन्हे दाखल झालेत. आरटीआयअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीत ही आकडेवारी समोर आलीय. त्यामुळे नागपूर पोलीस दलाच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

नागपूर शहर, राज्याची उपराजधानी आता क्राईम कॅपिटल होऊ लागलीय. 2017 मध्ये सप्टेंबरपर्यंत एकूण 64 खून झालेत. माहिती अधिकारात ही गंभीर बाब उघड झालीय. खुनाव्यतिरिक्त इतर गुन्ह्यांची संख्याही मोठी आहे. 7 हजार 237 गुन्हे नोंदवण्यात आलेत. गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या कमालीची वाढलीय. 

गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक करण्याचं काम सुरू आहे. एन कॉप्स आणि भरोसा सेलसारखे नवे प्रकल्प पोलीस दलात सुरू कऱण्यात आलेत. ऑनलाईन तक्रारींची सुविधाही सुरू झालीय. मात्र एवढं होऊनही गुन्ह्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. 

नागपूर स्मार्ट शहर करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारीही नागपुरात तैनात होते. तरीही गुन्हेगारीवर आळा घालण्यात अपयशच आलंय. वाढती गुन्हेगारी पोलिसांना नियंत्रणात ठेवता येत नसेल तर कुठे तरी काहीतरी चुकतंय यात शंकाच नाही.