A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का...

Barsu Refinery : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू गावात जमिनीच्या सर्वेक्षणावरून सध्या जोरदार गदारोळ सुरु झाला आहे. पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या जमीन सर्वेक्षणावरुन राज्यात मोठं राजकारण पेटलं आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 28, 2023, 05:21 PM IST
A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का... title=

Barsu Refinery : कोकणातील राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग (Ratnagiri Refinery And Petrochemicals Limited) ही रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी सोमवारपासून माती परीक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. माती परीक्षणावरुन स्थानिक आणि पोलिसांमध्ये (Police) जोरदार गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बारसू, धोपेश्वर, नाटे या गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावीत असल्याने माती परीक्षणाविरोध होऊ लागल्याने इथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

कोकणी माणूस प्रकल्पांच्या विरोधात आहे का?

कोकणात अनेक प्रकल्पांना याआधीसुद्धा विरोध झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नाणार रिफायनरी, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, रिलाएन्सचा महासेस, एर्नान अशा अनेक प्रकल्पांना कोकणात जोरदार विरोध झाल्यामुळे हे दुसऱ्या राज्यात गेले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांद्वारे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग ही रिफायनरी उभारण्यात येणार आहे.

रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प काय आहे?

भारत सरकारला ही रिफायनरी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर बांधायची आहे. ही रिफायनरी आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक असेल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील. यासोबतच आखाती देशांच्या सौदी अरमाको आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा भाग असणार आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. 2015 मध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी आधी रत्नागिरीतील नाणार गावाची निवड करण्यात आली. 15,000 एकर एवढ्या जागेवर नाणार प्रकल्प प्रस्तावित होता. तेव्हा शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यानंतर या प्रकल्पासाठी बारसू-सोलगावचा परिसर निश्चित करण्यात आला.

रिफायनरी म्हणजे काय?

रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरणाचा कारखाना. बाहेरच्या देशातून कच्चे खनिज तेल आणून ते तेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पात शुद्ध केले जाते. त्यातूनपे ट्रोल, डिझेल, एलपीजी, रॉकेल,बिटुमेन आणि पेट्रोलियम कोक, नाफ्ता आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा बाहेर पडतात. भारत हे पेट्रोलियम पदार्थ निर्यात करतो. 2020 मध्ये तर भारताने 25.3 बिलियन डॉलरचे पेट्रोलियम पदार्थ निर्यात केले होते. दरम्यान, भारतात जवळपास सरकारी आणि खासगी अशा   मिळून 23 रिफायनरी आहेत. त्यातील रिलायन्स पेट्रोकेमिकलची गुजरातमधील जामनगर येथील रिफायनरी ही जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी आहे. 

या प्रकल्पाला विरोध का?

पर्यावरण कार्यकर्ते, बारसू आणि सोलगाव गावातील लोक प्रदूषणामुळे या रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे येथील पर्यावरण व पाणी प्रदूषित होणार असल्याचे स्थानिकांचे मत आहे. या भागातील लोक मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहेत. हा प्रदेश हापूस आंब्यासाठीही ओळखला जातो. या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या आंब्याच्या, काजूच्या बाग जमीनदोस्त होतील आणि समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांच्या मासेमारी व्यवसायावर याचे दूरगामी परिणाम होतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतरही रिफायनरीसाठी 25 एप्रिलपासून जमीन सर्वेक्षण सुरू होणार होते, मात्र 24 एप्रिलच्या सकाळपासून स्थानिकांनी विरोध सुरू केला. सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्पाविरोध करत आंदोलनकांनी ते बंद पाडण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे.