फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Praveen Mane : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या प्रवीण माने यांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 7, 2024, 11:50 AM IST
फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा title=

Baramati Lok Sabha : राज्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कारण बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय लढत होणार आहे. मात्र आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्यासह सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने हे अजित पवार गटात जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर दौऱ्यादरम्यान प्रवीण माने यांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रवीण माने हे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर अखेर प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदापूरमध्ये सभा घेतली होती. या सभेपूर्वी इंदापूरमध्ये पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांच्या घरी जाऊन चहापान केले होते. त्यादरम्यान प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. दुसरीकडे प्रवीण माने हे 15 दिवसांपर्यंत इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते. मात्र आता प्रवीण माने आणि सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत माहिती नव्हती - प्रवीण माने

"महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत मला माहिती नव्हतं. सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही त्यांना आणि अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे," अशी प्रतिक्रिया प्रवीण माने यांनी दिली.

प्रवीण मानेंची भेट कशासाठी?

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी प्रवीण माने यांच्या भेटीमागचे कारण सांगितले आहे. "प्रवीण भैय्या माने व माझे जुने संबंध आहेत. ते नेहमी माझ्या घरी येत असतात. इंदापूरला आल्यावर तुम्ही माझ्याकडे येत नाहीत अशी त्यांची तक्रार होती. त्यामुळे आज त्यांच्या घरी जात चहा घेतला. माने हे आमचेच आहेत. आत्ताही ते आमच्या सोबतच आहेत," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.