Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर त्या आलेल्या नव्हत्या. मात्र लेकीसाठी, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार यांनी चक्क प्रचार केला. निमित्त होतं ते बारामतीत आयोजित महिला मेळाव्याचं. केवळ प्रतिभा पवारच नाही तर पवार फॅमिलीतील जवळपास सगळ्याच पॉवरफुल लेडीज या मेळाव्याला हजर होत्या...
बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार मैदानात उतरल्यायत. आज बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांसह पवार कुटुंबातील अन्य मान्यवर उपस्थित होते. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे अशा पवार घराण्यातल्या सगळ्या लेकी-सुना मेळाव्याला हजर होत्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होतेय. त्यामुळे पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जातेय.
शरद पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्येच आहे असं विधान शर्मिला पवार यांनी केलंय.. शर्मिला पवार या सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या जाऊबाई आहेत.. त्या अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार यात फरक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं.. आता शर्मिला पवारांनी त्या विधानाचं समर्थन केलं.. तसंच नणंदेची जागा घेणार नाही असंही शर्मिला पवार म्हणाल्यात. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा आहे.
शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. सुनेत्रा पवारांना बाहेरची सून म्हटल्यानं अजितदादांनी जोरदार टीका केली होती. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या रक्तात पवारांचा डीएनए असल्याचं शर्मिला पवारांनी मेळाव्यात सांगितलं. तर सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन सुनंदा पवारांनी केलं
प्रत्येक निवडणुकीत मिशन हायस्कूलच्या मैदानात सुप्रिया सुळेंची सांगता सभा व्हायची.. यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेसाठी मैदानाची जागा बुक केलीय. त्यामुळं याच मैदानात मोठा महिला मेळावा घेऊन आणि पवार कुटुंबातील सगळ्या महिलांना एकाच व्यासपीठावर आणून सुप्रिया सुळेंनी शक्तिप्रदर्शन केलं...
बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढाई आता टोकाला पोहोचलीय.. नणंद विरुद्ध भावजय या राजकीय लढाईत आता अख्खी पवार फॅमिलीच ओढली गेलीय... पवार कुटुंबातील महिला वर्ग सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं चित्र महिला मेळाव्याच्या निमित्तानं दिसलं.