Baramati Crime News: बारामती तालुक्यातील निंबुत येथे घडलेल्या एका गोळीबारीच्या घटनेमध्ये उपाचारादरम्यान एका प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये नींबुत तेथील गौतम काकडे यांच्या घरासमोर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात फलटण येथे ज्ञानज्योती अकॅडमी चालवणारे रणजीत निंबाळकर गंभीर जखमी झाले. रणजीत निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांच्यावर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी शहाजी काकडे, गौतम काकडे, गौरव काकडे आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यापैकी गौरव काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना अटक केली आहे. तर पोलीस आता शहाजी काकडेंचा शोध घेत आहेत.
गौतम काकडे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी फलटण येथील रणजीत निंबाळकर यांचा सुंदर नावाचा बैल 37 लाख रुपयांना विकत घेतला होता. त्या व्यवहारामधील पाच लाख रुपये गौतम यांनी रणजित यांना दिले होते. गुरुवारी उर्वरित रक्कम नेण्यासाठी काकडेंनी रणजीत त्यांना नींबूत येथे बोलावले होते. रणजित निंबाळकर हे 27 जून रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र राहिलेले 32 लाख रुपये न देता तुम्ही स्टॅम्प पेपरवर सही करा असं म्हणत काकडे आणि त्यांची मुलं रणजित निंबाळकरांवर बळजबरी करु लागले. त्यांच्यावर काकडे कुटुंबाने प्रत्येक पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रणजित यांनी पैसे मिळाल्याशिवाय आपण सही करणार असं सांगितलं.
दोन्ही गटांमध्ये मोठी बाचबाची झाली. अखेर रणजीत यांनी काकडे कुटुंबियांना विकलेला बैल पुन्हा मागितला. तुम्ही खरेदी केलेला बैल मला परत करा असं रणजित निंबाळकर म्हणू लागले. मात्र याच्यातून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. याच बाचाबाचीदरम्यान गौरव काकडेने त्याच्याकडील बंदूक काढून निंबाळकरांवर रोखली.
मात्र बंदूक पाहिल्यानंतरही निंबाळकर बैल परत घेऊन जाण्याच्या मागणीवर ठाम राहिले. तेव्हा गौरव काकडेने निंबाळकर यांच्यावर अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन डोक्यात गोळी झाडली. यात निंबाळकर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी बारामतीमधून पुढे पुण्याला हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणामध्ये हत्येच्या गुन्ह्याखाली कारवाई केली जाणार आहे. मात्र सदर घटनेमधील तिसरा आरोपी असलेले शहाजी काकडे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.