दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे महसूल मंत्री (Revenue Minister Balasaheb Thorat) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) प्रदेशाध्यक्षपद (Leave State President) सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती झी २४ तासला मिळाली आहे. यापूर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती काँग्रेसममधील सूत्रांनी दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर या पदासाठी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर ,नाना पटोले, विजय वड्डेटीवार, संग्राम थोपटे यांची नावे चर्चेत आहेत.
जून २०१९ मध्ये बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. सरकारमधील जबाबदारी आणि पक्षातील इतर जबाबदारी असल्याने आणि नवीन चेहर्याला संधी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष सोडण्याची इच्छा बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्याकडे दोन पद आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते अशी दोन पदं थोरात सांभाळत आहेत. दोन स्तरावर काम करताना त्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच महाराष्ट्रतील काही नेते सतत दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्ष बदलावा यासाठी हायकामंडकडे लॉबिंग करत होते.
या चर्चांमुळे अखेरीस बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी आणि त्यावरून दिल्लीत होणारी चर्चा त्यामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं काँग्रेसमधील त्यांचे निकटवर्तीय सांगतात.