Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल केलेल्या विधानावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी श्री रामाचंद्रांच्या आहाराबद्दल केलेल्या विधानावरुन केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वाद निर्माण झालेला. आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करताना आव्हाड यांना एका अर्थाने टोलाच लगावला.
मुंबईमध्ये शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक मान्यवरांना आमंत्रणं देण्यात आलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. छत्तीसगडसारख्या राज्याने तर 22 जानेवारी ड्राय डे घोषित केला आहे. तर काही लोक 22 जानेवारी रोजी मांस विक्रीवर बंदीची मागणी करत आहेत. एकीकडे या सक्तीवरुन वाद अन् चर्चा सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी, 'प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते,' असं वक्तव्य केल्यामुळं मोठा गदारोळ निर्माण झाला. आव्हाड यांनी विधानाच्या दुसऱ्याच दिवशी याबद्दल खेद व्यक्त केला. आपल्या विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असं आव्हाड यांनी पत्रकारांसमोर दिलगीरी व्यक्त करताना म्हटल्यानंतर वाद शांत झालां. मात्र या वादावर आज शरद पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलताना शरद पवारांनी असं वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं म्हटलं आहे. "जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा आधार म्हणून त्यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. ते वाल्मिक रामायण सगळे वाचू शकतात. त्यांनी हे वक्तव्य करायची गरज नव्हती. त्यांनी तसं वक्तव्य केलं नसतं तर बरं झालं असतं. मात्र, त्यांनी रामाची अप्रतिष्ठा केली आहे असं मी मानत नाही," असं शरद पवार म्हणाले. "प्रभू रामचंद्र हा श्रद्धेचा विषय आहे. देशातील जनतेच्या हृदयात रामाचं स्थान आहे. आमचीही रामावर श्रद्धा आहे आणि यापुढेही राहील,’ असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> फडणवीसांना ठाऊक आहे आमदार अपात्रतेचा निकाल? पवारांच्या 'त्या' विधानाने खळबळ
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण आल्यास अयोध्येला जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारण्यात आला. "आतापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही. आमंत्रण येईल असं वर्तमानपत्रातून समजतेय. पण 22 जानेवारीला तिथं गर्दी असेल. अशा परिस्थितीत मी तिथे जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर लोकांना तिथं पाठवण्याचा एका पक्षाचा कार्यक्रम आहे. तो झाल्यावर कधीही मी शांततेत जाईन. त्यासाठी आमंत्रणाची गरज नाही," असं पवार यांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं.
महापालिका शाळा व अन्य सरकारी शिक्षण संस्थांमध्ये रामावर निबंध व वर्त्कृत्व स्पर्धा घेण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरही शरद पवार यांनी आक्षेप नोंदवला आहे. "माझ्याकडं काही शिक्षकांनी आजच तक्रार केली की मुंबईचे पालकमंत्री यात जास्त लक्ष घालतायत. पूर्ण शक्ती लावतायत. हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे. सगळ्या धर्मांबद्दल आस्था राखणारे लोक इथं आहेत. आमच्याही मनात सर्व धर्मांबद्दल आस्था आहे. त्यामुळं नव्या पिढीच्या मुलांच्या मनावर ठरवून काही बिंबवण्याचं काम करणं हे योग्य नाही,’ असंही पवार म्हणाले.