नवी दिल्ली : अयोध्या राम मंदिर भुमिपुजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी कॉंग्रेस धावून आलीय. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलंय.
उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमीपूजन निमंत्रण द्यायला पाहीजे. निमंत्रण देण्यावरून भाजपचं राजकारण सुरु असल्याची टीका दलवाई यांनी केलीयं. कोरोना काळात भूमीपूजन केलं जातंय. मग सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल का? राम मंदिर बांधायला विरोध नाही पण त्यामुळे दंगली थांबणार आहे का ? रामराज्य येणार आहे का ? याची उत्तर मोदींनी द्यावी असेही ते म्हणाले.
सध्या राज्यात सुरु असलेल्या दुध आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. दूध भूकटी आयात केली जातेय.केंद्र सरकारला लाज वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठवाडा आणि विदर्भात दूध संकलन बंद आहे. दूध उत्पादनाकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहीजे. केंद्राने तात्काळ धोरण बदलावे अशी मागणीही दलवाई यांनी केली.
येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.