सांगली : जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजीच्या रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी उपस्थित होते.
सांगली मिरज कुपवाड शहर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये २२ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते ३० जुलै अखेर लॉकडाऊन । या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन । पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती @ashish_jadhao pic.twitter.com/ZCPICRwwZQ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 21, 2020
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या यापुढेही मर्यादित रहावी ३० जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे. लॉकडाऊन २२ जुलै रात्री १० नंतर सुरू होणार असल्याने नागरिकांच्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक गर्दी करु नये. खरेदीसाठी झुंबड उडू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सांगली जिल्ह्यात उपचाराखाली ५४५ रूग्ण असून आजतागायत १ हजार १३ रूग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत तर ३३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रात आजतागायत ३३२ रूग्ण पॉझिटिव्ह ठरले आहेत. या सर्व बाबींचा अत्यंत सूक्ष्म आढावा घेऊन जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या झालेल्या मृत्यूंची कारणमिमांसा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाणून घेतली. यावेळी त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कंटेनमेंट झोन एरियात मोठ्या प्रमाणावर रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट घेण्यात याव्यात असे निर्देशित केले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडे असलेल्या सुविधांच्या उपलब्धतेबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका क्षेत्रात कोविड केअर सेंटर्स मध्ये ८७० बेडस् ची व्यवस्था उपलब्ध आहे. यामध्ये सद्या १२५ रूग्ण आहेत. तर ग्रामीण भागात इस्लामपूरमध्ये ३४० बेडस् त्यामध्ये ८ रूग्ण, विट्यामध्ये १२८ बेडस् त्यामध्ये ४ रूग्ण, जतमध्ये २२५ बेडस् त्यामध्ये १२ रूग्ण, आटपाडीमध्ये ९० बेडस् त्यामध्ये १५ रूग्ण, पलूसमध्ये ५० बेडस् त्यामध्ये ८ रूग्ण, शिराळा येथे ५० बेडस् त्यामध्ये ४ रूग्ण, कवठेमहांकाळ येथे २५ बेडस् त्यामध्ये ६ रूग्ण, तासगाव येथे ३० बेडस्, चिंचणी येथे ५० बेडस् त्यामध्ये ६ रूग्ण अशी स्थिती असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले.
डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये मिरज सिव्हील येथे ३१५ बेडस् उपलब्ध असून भारती हॉस्पीटलमध्ये १०० बेडस् ठेवण्यात आले आहेत. तर मिरज मिशन येथे सद्यस्थितीत ९० बेडस् आहेत. या ठिकाणी डीसीएच सुविधा आवश्यकतेनुसार वाढविण्यात येते, असे सांगून महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत संलग्न असणारी तीन खासगी रूग्णालये सद्या कोविड-१९ वरील उपचारासाठी घेण्यात आली असून यापुढेही खाजगी हॉस्पीटल्स कोविड-१९ वरील उपचारासाठी घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.