अतिष भोईर, झी मीडिया
Kalyan News Today: कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रिक्षातून प्रवास करताना एक महिला बॅग विसरली होती. या बॅगेत सोन्याचे दागिने होते. रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे. महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे. या बॅगमध्ये तब्बल सात तोळं सोनं होतं.
ठाण्यात राहणारी नम्रता देशमुख ही महिला एका लग्न सभारंभासाठी मुरबाडला जाणार होती. त्या आधी त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरीता कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात जाणार होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरुन नम्रता यांनी चिकनघरसाठी रिक्षा पकडली त्याच्या जवळ असलेल्या तीन बैगापैकी एक बॅग रिक्षातील सीटच्या मागे ठेवली. चिकनघर आल्यावर नम्रता दोन बॅग घेऊन खाली उतरल्या आणि नातेवाईकाकडे गेल्या. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्यांची एक बॅग त्या रिक्षातच विसरल्या आहेत. नेमक्या रिक्षात विसरलेल्या बॅगेतच त्यांचे दागिने होते.
नम्रता यांनी लगेचच महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेस साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मधाळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्हीत त्यांना रिक्षाचा नंबर सापडला. पोलिसांनी त्वरीत रिक्षा चालकास शोधून काढले. रिक्षा चालकाशी संपर्क साधला असता रिक्षा चालक मोहन राठोड याने प्रामाणिकपणे सांगितले की, ती बॅग रिक्षात आहे. मी ती बॅग परत करण्यासाठी महिलेला शोधत होतो. या दरम्यान तुमचा फोन आला. मी ही बॅग रिक्षा युनियनच्या कार्यालयात ठेवणार होतो.
पोलिसांनी या घटनेची माहिती नम्रता यांना दिली. पोलिसांनी रिक्षा चालकाला पोलीस ठाण्यात बॅग घेऊन बोलवले. तसंच, नम्रता यांनाही बोलवून त्यांची त्यांना पोलिस त्यांची बॅग त्यांना सूपुर्द केली. तेव्हा नम्रता यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. महिलने पोलिसांसह रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत. तर, प्रमाणिकपणा दाखवून बॅग परत केल्याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला आहे.