हर्सूल कारागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

योगेशला कारागृहात जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Updated: Jan 21, 2019, 11:56 AM IST
हर्सूल कारागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश title=

औरंगाबाद : हर्सूल कारागृहात योगेश राठोड या २९ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. या युवकाच्या मृत्यूची गंभीर दखल घेण्यात आलीय. पोलीस महासंचालकांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकरणी कारागृह अधीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज दुपारपर्यंत चौकशी समिती कारागृहात दाखल होत आहे. कच्चा कैदी असलेल्या योगेशला कारागृहात जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. २४ तास उलटूनही योगेशच्या मृतदेहावर नातेवाईकांनी अंत्यंसंस्कार केलेले नाहीत. 

मयूर पार्कइथल्या घृष्णेश्वर कॉलनीत राहणाऱ्या योगेश रोहीदास राठोड या तरुणावर तीन वर्षांपूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टानं काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटनंतर हर्सूल पोलिसांनी त्याला गुरुवारी अटक करून कोर्टासमोर हजर केलं. त्यानंतर त्याची रवानगी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजल्याच्या दरम्यान हर्सूल पोलिसांनी त्याला जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी त्याच्या अंगावर प्रचंड मारहाणीचे निशाण होते. यानंतर शनिवारी रात्री योगेशनं अखेरचा श्वास घेतला. 

दरम्यान, योगेश राठोडला हर्सूल कारागृहात मारहाण झाल्याचा दावा कारागृह अधीक्षक अनुपकुमार उमरे यांनी मीडियाशी बोलताना फेटाळून लावला. योगेश कारागृहात फीट येऊन खाली पडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

छगन भुजबळांनी घेतली कुटुंबीयांची भेट

औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात मृत्यू झालेल्या योगेश राठोडच्या कुटुंबियांची छगन भुजबळ यांनी घाटी रुग्णालयात जाऊन  भेट घेतली. कुटुंबीयांनी कारागृह पोलिसांच्या मारहाणीत योगेशचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची यावेळी छगन भुजबळ यांनी मागणी केली. कारागृहातही कैदी सुरक्षित नसल्याचं आरोप यावेळी भुजबळ यांनी केलाय.