औरंगाबाद : कांचनवाडीत कचरा प्रश्न चांगलाच पेटलाय. आज महापालिकेनं कांचनवाडीत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध करताना हिंसक पवित्रा घेतला. यावेळी दगडफेक करण्यात आली.
राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसगाड्यांवर यावेळी दगडफेक करण्यात आली. तसंच एका खासगी गाडीच्याही काचा फोडण्यात आल्या. आंदोलन करणा-या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, कच-याच्या गाड्या अजूनही रोडवरच अडकलेल्या आहेत.
औरंगाबाद कचरा प्रश्न गेली १४ दिवस सुरु असला तरी हा प्रश्न अचानक उदभवला नाहीये. तर हा प्रश्न गेली ४० वर्षांपासून कायम आहे. पालिका गेली ४० वर्ष नारेगावमध्ये कचरा टाकतेय. मात्र कचरा डंप करण्यापलिकडे पालिकेने काहीच केलं नाही आणि त्याचे परिणाम आता शहराला भोगावे लागत आहेत. कचरा प्रश्न आता एका न सुटणा-या वळणावर येवून थिजलाय. दुर्देवानं शहरातील लोकप्रतिनिधी अजूनही सुस्त आहेत.