लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : महाराष्ट्रातला प्रसिद्ध आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. वडापाव खायला आवडत नाही असं म्हणणारे फारच क्वचित आढळतील. पण हाच वडापाव एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं तर. वडापाववरुन झालेल्या भांडणात एका तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
वडापावला पाच रुपये कमी पडले म्हणून वडापाव दुकानदाराने ग्राहकाचा खुन केल्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. अहमदनगर च्या एमआयडीसी भागातील सह्याद्री चौकात ही घटना घडली असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रवीण कांबळे हा तरुण वडापावच्या दुकानावर गेला होता. दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयाला असल्याचं सांगितल्यानंतर प्रवीणने त्याला पाच रुपये कमी करण्यास सांगितलं. यावरुन दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली. या वादावादीचं रूपांतर हाणामारीत झालं.
वडापाव दुकानदाराच्या मदतीला आलेल्या आसपासच्या काही लोकांनी मिळून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या प्रवीणला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्रवीण कांबळे याच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.