विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये गेल्या पाच दिवसांपासून 'जय श्रीराम' घोषणेवरुन मोठा वाद निर्माण झाला होता... पण आता हा चक्क बनाव असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये धुमसणारा मुद्दा म्हणजे 'जय श्रीराम म्हणा नाही तर मारहाण करु...' यावरुन बरंच वातावरण तापलं. पण हा निव्वळ बनाव असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याचं औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केलंय.
जमावाच्या मारहाणीच्या घटना देशभरात वाढत असताना औरंगाबाद पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे याचा तपास केला आणि समोर आलं धक्कादायक सत्य... हडकोमध्ये जय श्रीराम म्हणण्यावरुन काहीच झालं नव्हतं... ते फक्त किरकोळ भांडण होतं... तर सूत्रांच्या माहितीनुसार आझाद चौकातही 'जय श्रीराम घोषणा दिली नाही तर मारहाणीची धमकी' हा निव्वळ बनाव होता.
धक्कादायक म्हणजे फिर्यादीनंच तशी कबुली पोलिसांना दिलीय. त्यामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांना क्षमा नाही, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय.
या प्रकरणी दोषींना अद्दल घडवण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. पण, मग नक्की हा बनाव केला कशासाठी? शहरातलं वातावरण नेमकं कोण बिघडवतंय आणि भडकवतंय? याचा तपास पोलीस करत आहेत, असा प्रश्न पोलिसांसमोर आहे.
औरंगाबादला मोठा दंगलीचा इतिहास आहे. निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकार नेहमीचेच... वेळीच हे प्रकार चिरडून टाकावे लागणार आहेत.