शिट्टी मारतो... छेड काढतो... सिल्लोडमधल्या त्या तरुणाच्या खूनाचं रहस्य उलगडलं

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण पोलीस तपासात वेगळीच कहाणी समोर आली

Updated: Jan 4, 2023, 06:51 PM IST
शिट्टी मारतो... छेड काढतो... सिल्लोडमधल्या त्या तरुणाच्या खूनाचं रहस्य उलगडलं title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला शेतात पाणी भरण्यास गेलेल्या रवींद्र काजळे या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सिल्लोडमधल्या (Sillod) या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) रवींद्रचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. पण तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. रवींद्रचा खून झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी गावातीलच गणेश कैलास चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्रचा खून केल्याची कबूली गणेशने पोलिसांसमोर दिली आहे. 

हत्येमागे कारण काय?
मृत रवींद्र काजळे आणि आरोपी गणेश चव्हाण हे एकाचा गावात राहणारे असून एकमेकांना ओळखतात. मृत रवींद्र हा गणेशच्या पत्नीची छेड काढत (Wife Teasing) असे. गल्लीतून येता-जात तिला वाईट नजरेने बघणं आणि शिट्ट्या मारत तिला त्रास देत होता. याप्रकरणी गणेशने रमेशला अनेकवेळा समजावून सांगितलं होतं. पण रवींद्रच्या सवयीत काही बदल झाला नाही. अनेकवेळा सांगूनही रवींद्र पत्नीची छेड काढत असल्याचा राग आरोपी गणेशच्या डोक्यात होता. 

असा रचला खूनाचा कट
रवींद्रचा काटा काढण्यासाठी गणेश संधीच्या शोधात होता. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याला ही संधी मिळाली. मृत रवींद्र आणि त्याच्या मोठ्या भावाने गावाजवळील एका शेतात नव्या वर्षाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. रवींद्र आणि त्याचा भाऊ एकत्रच शेताजवळ जाणार होते, पण शेताला पाणी द्यायचं असल्याने रवींद्र दुचाकी घेऊन पुढे निघाला. 

हे ही वाचा : मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार

रवींद्र शेताजवळ जात असताना रस्त्यात मध्येच गणेशने त्याला थांबलं आणि लिफ्ट मागितली. यानंतर दोघंजण दुचाकीने जात असताना मागे बसलेल्या गणेशने रवींद्रवर चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात रवींद्रचा जागीच मृत्यू झाला. खून करुन आरोपी गणेश तिथून फरार झाला. दरम्यान गावाजवळील रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, हा मृतदेह गावातील रवींद्र नावाच्या तरुणाचा असल्याची पोलिसांना मिळाली. बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्रचा मृत्यू झाल्याचा अंदाज गावातील नागरिकांनी व्यक्त केला. पण पोलिसांच्या तपासात आजूबाजूला कुठेच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या दिशेने तपास सुरु केला. अखेर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं.