Aurangabad Crime : देशभरात गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळीसारखे प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) केरळमध्ये या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोणत्या ना कोणत्या आमिषाला बळी पडत नरबळी दिला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्येही ( Sambhaji Nagar ) नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संभाजी नगरच्या वाळूजमधील समता कॉलनीत एका बंद घरात मिठामध्ये पुरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे घर मागील तीन महिन्यांपूर्वी भाडेकरू बाहेरगावी जात असल्याचे सांगून गेल्यानंतर बंद होते. मात्र, नवीन भाडेकरू आल्यामुळे घरमालकाने घराचे कुलूप तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मृतदेहावर शाल टाकून शेंदूर लावलेले दोन दगड आणि काही लिंबू ठेवलेले होते. त्यामुळे, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घरात धानोरा गावातील काकासाहेब भुईगळ हे घर भाड्याने घेऊन राहत होते. भुईगळ यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन मुली राहत होत्या. काकासाहेब भुईगळ यांची एक 20 वर्षीय दिव्यांग होती.
भुईगळ हे पूजाअर्चा, मांत्रिकाचे काम करत असत. घरमालक शेळके हे त्यांच्या आजारी वडीलांमुळे बहुतेक या गावीच राहत होते. तीन महिन्यांपूर्वी भाडेकरू भुईगळ यांनी कुटुंबासह गावाकडे जात असल्याचे घरमालक शेळके यांना सांगितले. त्यानंतर खोलीला कुलूप लावून भुईगळ कुटुंबासह निघून गेले. 3 महिन्यांपासून घरभाडे न दिल्याने नवीन भाडेकरूला घर देण्यासाठी शेळके यांनी घर उघडले आणि हा सर्व प्रकार समोर आला.
सिमेंटचा भाग
घरमालकाने घरात दुर्गंध येत असल्याने स्वयंपाकघरातील ओट्याच्या खालील भागाची पाहणी केली, तेव्हा त्यांना खालचा अर्धा भाग सिमेंट व वाळूने बंद केल्याचे दिसून आले. त्यावर दोन शेंदूर लावलेले दगड व काही लिंबू ठेवलेले आढळले. त्यांनी सिमेंटने बंद केलेला भाग फावड्याने फोडला असता त्यात मिठामध्ये पुरलेला कपड्यांमध्ये गुंडाळलेला कुजलेला मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराची पाहणी करत पुढील तपास सुरु केलाय.