शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, गोळी बंदुकीतच अडकली! मग…

शिंदे गटाच्या नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.  अहमदनगर जिल्ह्यात हा थरार घडला आहे

Updated: Feb 15, 2024, 07:23 PM IST
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न, गोळी बंदुकीतच अडकली! मग… title=

Ahmednagar Crime News : राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्रात गोळीबारासारख्या थरारक घटना घडत आहेत. एका महिन्यात चार गोळीबार घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये घडली आहे.  शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, गोळी बंदुकीतच अडकल्याने या घटनेत नगरसेवक थोडक्यात बचावले आहेत. 

पैलवान युवराज पठारे असे हल्ला झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव आहे. पठारे हे पारनेर नगरपंचायतचे शिंदे गटाचे नगरसेवक आणि पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. युवराज पठारे यांच्यावर भरदिवसा गावठी कट्ट्यातुन गोळीबार करण्याचा प्रयत्न हल्लेखोरांकडून करण्यात आला.

पारनेर एसटी स्टँड समोरील हाॅटेल दिग्विजय समोर ही घटना घडली आहे. हल्लेखोराने पठारे यांच्यावर गोळीबारातचा प्रयत्न केला. मात्र, गोळी अडकल्यामुळे फायर झाला नाही. त्याचवेळी पठारे व सहकार्‍यांनी चलाखीने आरोपीच्या हातातील कट्टा हिसकावुन घेतला. त्यानंतर हल्लेखोराने लगेच धारदार शस्राने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पठारे यांनी त्याचे हात तत्काळ पकडले आणि चाकु हिसकावुन घेतला. पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून हल्लेखोरास पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवराज पठारे या घटनेमधुन थोडक्यात बचावले आहेत.  पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत  हल्लेखोरास ताब्यात घेतले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पारनेर शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात गुंडराज

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु आहे का? असा प्रश्न उपस्तिथ करणाऱ्या घटना सातत्याने महाराष्ट्रात घडत आहेत. एका महिन्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळवर  गोळीबार करण्यात आला. भर दिवसा गोळ्या झाडून मोहोळची हत्या करण्यात आली. यानंतर 2 फेब्रुवारी  कल्याणजवळील उल्हासनगरमध्ये सत्ताधारी भाजपचा आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे. भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या पदाधिका-यावरच गोळीबार केला. 7 फेब्रुवारीला जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडीमधली ही घटना आहे. माजी भाजप नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे आपल्या कार्यालयात बसलेले असताना, तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर 8 फ्रेब्रुवारी रोजी मुंबईच्या दहिसरमध्ये घडली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची अगदी जवळून गोळी झाडून हत्या करण्यात आली. ते  माजी आमदार विनोद घोसाळकरांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या घालणाऱ्या मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.