काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं, भाजपात मानसन्मान मिळतो- हर्षवर्धन पाटील

भाजपात मानसन्मान दिला जातो असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.

Updated: Oct 3, 2019, 08:56 AM IST
काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं, भाजपात मानसन्मान मिळतो- हर्षवर्धन पाटील title=

दीपक भातुसे, झी मीडिया, इंदापूर : काँग्रेसने मला वाऱ्यावर सोडलं आणि मित्रपक्षांनी दिलेला शब्द पाळला नाही पण भाजपात मानसन्मान दिला जातो असे विधान हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. भाजपात दिलेला शब्द पाळला जातो तसेच फसवणूक होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पाच वर्ष मी कुठल्या पदावर नव्हतो तरी पक्षासाठी खूप केलं. काँग्रेसमधून जाताना मी काँग्रेसचे उपकार ठेवले नाहीत, मी उलट काँग्रेसवर उपकार करून आलोय असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मागील पाच वर्ष शेतीच्या पाण्याची समस्या, नवीन उद्योगधंदे नाही, प्रशासनावर वचक नाही अशी परिस्थिती मतदारसंघात आहे. पाच वर्षात झालेल्या चुका आत्मपरीक्षण करून सुधारल्या पाहीजेत. इंदापूरची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांची निवडणूक राहीली नाही ती निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे काँग्रेस, राष्ट्रवादीतील लोक का सोडून जातात ? याचे दोन्ही पक्षांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही हर्षवर्धन यांनी दिला. 

अजित पवारांनी राजीनामा का दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यावर भाष्य करायचं नाही. मात्र राज्य सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाचे आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे होईल. असे म्हणत त्यांनी याविषयाला बगल दिली. काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे कुठलेच नेतृत्व नाही त्यामुळे नेतृत्व कोण करणार आहे हे पाहून निवडणुका होतात. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला लोक पसंती देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.