पुणे : माझ्या मतदार संघात दादांना (चंद्रकांत पाटील) बहुमत देणार, असे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी पहिल्याच मेळाव्यात जाहीर केले. मला खंजीर खुपसला तरी चालले, पण कोणत्या वावड्या नको, असे सांगत भाजपचा विजय असो अशी घोषणा यावेळी मेधा कुलकर्णी यांनी दिली. यावेळी त्या भावनिक झाल्या होत्या. हा माझा मतदार संघ आहे. मी माझी माणसे जोडली आहेत. ही माझी माणसे आहेत, असे सांगताना माझी शाळा असे उदाहरण देत ती आपली मालकी नसते तर आपुलकी, आपली भावना असते. तसेच मी माझ्या मतदार संघाबाबत बोलत आहे. यापुढे दादा जी जबाबदारी देतील ती मी पुढे नेईन, असे त्या म्हणाल्यात.
कोथरूड मतदारसंघातून पाटील यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि उमेदवारीसाठी इच्छुक असणारे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर उमटला होता. मेधा कुलकर्णी कमालीच्या नाराज झाल्या होत्या. मात्र, त्यांची पक्षाकडून समजूत काढण्यात आली आहे. तरीही त्या खूपच भावनिक झाल्याचे पहिल्या मेळाव्यात पाहायला मिळाले. नगरसेवक ते आमदारकीपर्यंतचा प्रवास सांगताना, मेधा कुलकर्णी भावूक झाल्याचे दिसून आले.
कोथरूडचे आजवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाली आहे. आता त्यांच्याकडून देखील भविष्यात कोथरूडचा कायापालट होईल. तसेच या निवडणुकीत माझ्याकडे पक्षाच्यावतीने जी जबाबदारी दिली जाईल, ती मी पार पाडणार आहे. मला खंजीर खुपसला, तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील हे राज्यातील एकमेव उमेदवार सर्वाधिक मतांनी निवडून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.