मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ साठी प्रचार अखेर संपलाय. परंतु, या निवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झालीय... ती म्हणजे सर्वाधिक सभांची... निवडणूक जाहीर झाल्यापासून एकूण ६५ तर त्यापूर्वी महिनाभरातील महाजनादेश यात्रेदरम्यान सुमारे १६० सभा घेतल्याचं भाजपाकडून सांगण्यात येतंय. निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच सुमारे १४४ मतदारसंघ मुख्यमंत्र्यांनी 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून पिंजून काढले होते. 'महायुती'च्या जागांची निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्रभर भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातील वरीष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाकाच सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यात प्रचाराची एकच राळ उडविली गेली. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सर्वाधिक म्हणजेच तब्बल ६५ सभांच्या विक्रमाची नोंद झालीय. तसंच राज्याच्या निवडणुका असल्या तरी जम्मू-काश्मीर संबंधातील अनुच्छेद ३७० हटवण्याचा तसंच विकासाचा मुद्दा या प्रचारात आघाडीवर राहिला. शिवसेनेकडूनही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारांचा धडाका सुरू ठेवला.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीत शेवटची सभा पार पडली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या शिवसेना उमेदवार संदीप गड्डमवार यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या क्षेत्रातून आमदार आहेत. फडणवीस यांचे मूळ गाव असलेल्या 'मूल'च्या जवळ हे सावली तालुकास्थळ आहे. युतीच्या घटकपक्षांसाठी मुख्यमंत्री सभा घेतील, असे आधीच निश्चित झाले होते. ब्रम्हपुरी या मतदारसंघातील ही सभा नियोजनपूर्वक ठरविण्यात आल्याचे दिसते. यातून वेगळा संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय. विशेष म्हणजे शिवसेनेची संघटनात्मक शक्ती शून्य असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई यांनी हे तिकीट एकेकाळचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गड्डमवार यांच्यासाठी खेचून आणले आहे. यावेळी, विरोधी पक्षनेत्याला घरी बसवण्यासाठी शेवटची सभा वडेट्टीवारांच्या मतदारसंघात सभा घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. गेल्या पाच वर्षात भाजपा सरकारनं जेवढी कामं केली तेवढी कामं पंधरा वर्षात आघाडी सरकारनं केली नाहीत असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. प्रचाराच्या शेवटच्या दिवसात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या ६० सभा, सुप्रिया सुळे १२ सभा, अजित पवार ३५ सभा आणि ५ रोड शो, जयंत पाटील - अमोल कोल्हे यांच्या प्रत्येकी तब्बल ६५ सभा पार पडल्या. तसंच छगन भुजबळ ४८, धनंजय मुंडे ३८, सुनिल तटकरे १२ सभा आणि ५ चौक सभा पार पडल्या.
काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरलेले दिसले. महाराष्ट्रात त्यांच्या पाच सभांचं आयोजन करण्यात आलं. परंतु, या प्रचारात सोनिया गांधी आणि प्रियांक गांधी मात्र दिसल्याही नाहीत.